मोठा अनर्थ टळला : मुदाळतिट्टा.. बोरवडे फाटा येथे दूधगंगा प्रकल्‍पाच्या कालव्यावरील पूल कालव्यात कोसळला

दूधगंगा कालव्यावरील पूल कालव्यात पडला
दूधगंगा कालव्यावरील पूल कालव्यात पडला
Published on
Updated on

मुदाळतिट्टा : प्रा.शाम पाटील कोल्हापूर जिल्ह्याला वरदायीनी ठरलेल्या दूधगंगा प्रकल्पाच्या निढोरी शाखा कालव्यावरील बोरवडे फाटा येथे कालव्यावर उभारण्यात आलेला पूल आज (रविवार) सकाळी कालव्यातच पडला. कालव्यावरील पूल पडण्या अगोदर पाच मिनिटे तेथून पंधरा एक महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पास झाला. दुसरा ट्रॅक्टर रिकामा पूल पास करत असतानाच तो पूल कालव्यातच कोसळला. गावकऱ्यांनी कालव्यात अडकलेला ट्रॅक्टर बाहेर काढला. जर महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावर असताना पूल पडला असता तर काय झाले असते असा तर्क वितर्क लढवत बरं झालं अनर्थ टळला असे उद्गार उपस्थित नागरिकांकडून येत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, निढोरी शाखा कालव्यावर बोरवडे फाटा येथील डोंगराकडील शेताकडे जाण्यासाठी कालव्यावर पुल उभारण्यात आला होता. सदरचा पूल काँक्रीटिककरणामध्ये तयार केला होता. पुलाच्या मधला पिलर हा दगडी बांधकामामध्ये होता. बऱ्याच दिवसांपासून वेगाचे पाणी वाहत असल्यामुळे हा दगडी पिलर ढासळत आला होता. याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांनी संपर्क साधला होता. प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी झाली होती, पण त्याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केला.

आज रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान सदरचा पूल बरोबर मध्येच मोडला. पिलर होता तो पण कोसळला आणि पूल कालव्यातच पडला. हा पूल कालव्यात पडण्याअगोदर पाच मिनिटांपूर्वी याच पुलावरून पंधरा एक महिलांना शेतातील उसाची भांगलण करण्यासाठी एका ट्रॅक्टर मधून पलीकडल्या बाजूला पोहोचवण्यात आले होते. त्यानंतर दुसरा रिकामा ट्रॅक्टर या पुलावरून चालला होता. ट्रॅक्टर मध्यभागीच असताना अचानक पुलाचा पिलर कोसळला व सदरचा पूल मध्येच मोडल्याने तो आहे तसाच कालव्यात पडला. रिकामा ट्रॅक्टरही गावकऱ्यांनी वरती ओढून बाहेर काढला. पूल पडला पण जीवित हानी मात्र टळली. वेळ आली होती पण काळ आला नव्हता असाच प्रसंग आज येथे उपस्थित असलेल्या लोकांना अनुभवास मिळाला. कालव्यावरील पूल पडला असला तरी पाण्याचा प्रवाह येथून सुरूच आहे. उंचवटा भाग असल्याने पाणी प्रवाहामध्ये सध्या तरी कोणताही अडथळा दिसून येत नाही. त्यामुळे पाणी वाहने सुरू आहे.

हा पूल पडल्याने येथून पलीकडे जाणाऱा रस्‍ता बंद झाला आहे. आता येथून प्रवास करणाऱ्या शेतकरी मंडळींना उंदरवाडी बेलजाई जवळ असणाऱ्या पुलावरून परत या ठिकाणी यावं लागणार आहे किंवा मुदाळतिट्टा येथून जावे लागणार आहे. त्यामुळे वेळ खर्च होणार आहे. पडलेला पूल तात्काळ उभा करावा अशी मागणी येथील शेतकरी बांधव करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news