कोल्हापूर : सुलगाव फाट्यानजीक चालत्या दुचाकीवर माकडाची झडप; सोहाळेतील दोघेजण जखमी | पुढारी

कोल्हापूर : सुलगाव फाट्यानजीक चालत्या दुचाकीवर माकडाची झडप; सोहाळेतील दोघेजण जखमी

सोहाळे; सचिन कळेकर : सोहाळे (ता.आजरा) येथून आजऱ्याला निघालेल्या दुचाकीवर एका माकडाने अचानक उडी मारल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील दोघे तरुण जखमी झाले. संतोष आप्पासाो देसाई (वय ४०) व निखिल धोंडीबा कळेकर (वय २९, दोघेही रा. सोहाळे, ता. आजरा) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (दि. २०) सकाळी घडली.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, देसाई व कळेकर हे नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता आजरा या ठिकाणी कामाकरिता आपली दुचाकी घेवून जात होते. दरम्यान जात असताना सुलगाव फाट्यानजीक माकडांच्या कळपातील माकडाने अचानकपणे गाडीवर उडी मारली. यामध्ये संतोष देसाई व निखिल कळेकर हे गंभीर जखमी झाले. तातडीने स्थानिकांच्या मदतीने नातेवाईकांनी त्यांना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

त्या ठिकाणी जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान याची माहिती समजताच आजरा वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी, चंदगडचे वनपाल कृष्णा डेळेकर, वनरक्षक प्रियंका पाटील आदींनी उपचार घेत असलेल्या ठिकाणी जखमींची भेट घेतली व विचारपूस केली. व वनविभागाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान प्राथमिक उपचारानंतर जखमींना खाजगी दवाखान्यात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले. देसाई यांना डाव्या पायाला तर कळेकर यांच्या डाव्या खांदयाला गंभीर दुखापत झाली आहे.

गव्यांपाठोपाठ माकडांचाही उच्छाद

गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यात गव्यांचा हैदोस सुरु आहे. यापाठोपाठ अलिकडच्या काळात माकडांनीही मोठया प्रमाणावर उच्छाद मांडला आहे. माकडांकडूनही शेती पिकांचे नुकसानसह अन्य हल्ल्यांसारख्या घटना घडत आहेत. वनविभाने माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही आता जोर धरु लागली आहे.

Back to top button