कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये राजकीय हालचालींना वेग; तीन मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश | पुढारी

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये राजकीय हालचालींना वेग; तीन मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज शहरामध्ये मोठी राजकीय खलबतं सुरु आहेत. शहरामध्ये सत्तेत असलेल्या जनता दलाचे प्रमुख तीन शिलेदार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (दि. १०) मुंबई येथे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यासोबत तालुक्यातील भाजपचाही एक सरपंच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून, यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

जनता दलाचे माजी नगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नितीन देसाई, उदय पाटील, माजी बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता मंगळवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. याबाबत प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधला असता खणगावे, पाटील व भद्रापूर हे मुंबईला रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले असून, बुधवारी ते राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

करंबळीचे सरपंच देखील राष्ट्रवादीत

याबरोबरच करंबळी येथील भाजपचे सरपंच अनुप पाटील हे देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून, अ‍ॅड. सतीश ईटी, जनता दलाचे विनोद बिलावर हे देखील प्रवेश करणार आहेत. याशिवाय गडहिंग्लजच्या शिक्षण क्षेत्रातील प्रमुख व्यक्तीही राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर असून, गडहिंग्लज शहरात पालिकेच्या राजकारणात मोठा भूकंप ठरणार आहे. जनता दलासाठी खणगावे, भद्रापूर, पाटील हे निवडणूक जिंकणारे हुकमी एक्के होते. नितीन देसाई वगळता या तिघांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याने जनता दलासाठी हा फार मोठा धक्का मानला जात असून, त्यांच्यासोबत जाणारे कार्यकर्ते पाहता आजघडीला जनता दलाला भगदाड पडल्याचे स्पष्ट होते.

याशिवाय करंबळीचे सरपंच व समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक अनुप पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश पाहता घाटगे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणार्‍या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ना. मुश्रीफ यांच्यासाठी हे बेरीज म्हणावी लागणार आहे.

गेली वीस वर्ष आम्हाला मदत करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची काही कामे प्रलंबित असून त्यासाठी सत्तेत असलेल्या पक्षासोबत जाणे आवश्यक्य असल्याने हा निर्णय घेतला आहे
– बसवराज खणगावे, माजी नगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद जनता दल

गडहिंग्लज शहरांमध्ये राहिलेली विकास कामे पूर्ण करण्याचे माझे स्वप्न असून त्यासाठी सत्तेतील पक्ष सोबत सहभागी होण्याचे ठरवले आहे.
– नरेंद्र भद्रापूर, माजी सभापती बांधकाम विभाग गडहिंग्लज नगर परिषद

करंबळी गावच्या विकासाला माझ्या दृष्टीने प्राधान्य असून त्यासाठी नामदार मुश्रीफ यांच्यावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी जात आहे
– अनुप पाटील, लोकनियुक्त सरपंच करंबळी

Back to top button