कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या एमडींना मारहाण | पुढारी

कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या एमडींना मारहाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजाराम कारखान्यात विरोधी गटाच्या ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गळीतासाठी जाणून-बुजून नेत नाहीत, ऊस नोंदी करत नाहीत या कारणास्तव कसबा बावड्यातील संतप्त शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याचे आज (दि. २) पहायला मिळाले.  कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर पाटील गल्ली समोर गाडी आडवून बेदम चोप दिला.

नुकतीच राजाराम कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत अनेकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. तरीही कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली. आता कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र ऊस तोडीची तारीख ओलंडूनही केवळ विरोधक म्हणून आपला ऊस नेला जात नाही अशी भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यात होती. याबाबत विरोधी गटाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर दोन वेळा धडक मारून जाब विचारला होता. याबाबत पण याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे मत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त होत्या.

पहा व्हिडिओ

मंगळवारी सकाळी काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात जाऊन आपल्यावर अन्याय होत असल्याबाबत निवेदन देऊन न्याय मिळण्यासाठी विनंती केली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनीही या निवेदनाची दखल घेत राजाराम कारखाना प्रशासनाला पत्राद्वारे कळवले आहे.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक आपले काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्ली समोर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली.

संतप्त शेतकऱ्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे त्यांचा राग अनावर झाला होता, कार्यकारी संचालक यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी गाडीवरील लाता हाणण्यात आल्या, गाडीचा दरवाजा तोडण्यात आला.

सायंकाळची वेळ त्यातच गळीत हंगाम सुरू त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. दहा मिनिटे सुरू राहिलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी झाली. काहींनी मध्यस्थी करून कार्यकारी संचालक चिटणीस यांना पुन्हा गाडीत बसवले आणि त्यांची गाडी मार्गस्थ झाली.

Back to top button