Gokul Dairy | अवसायन प्रक्रियेतील ७०० दूध संस्‍था ठरणार अपात्र?

सुनावणी प्रक्रिया पूर्ण; १३२० पैकी ५५ संस्‍था गैरहजर : पुढील आठवड्यापासून निकाल
Gokul Dairy |
Gokul Dairy | अवसायन प्रक्रियेतील ७०० दूध संस्‍था ठरणार अपात्र?
Published on
Updated on

कोल्‍हापूर : अवसायन प्रक्रियेतील १,३२० पैकी सुमारे ७०० दूध संस्‍थांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे. मंगळवारी (दि.९) सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली. संपूर्ण प्रक्रियेमध्‍ये दोनवेळा पत्र पाठवूनही ५५ संस्‍था गैरहजर राहिल्‍या. पुढील आठवड्यापासून सहायक निबंधक कार्यालयाकडून दूध संस्‍थांना निकाल देण्‍यास सुरुवात केली जाणार आहे.

गोकुळने संलग्‍न दूध संस्‍थांवर आक्षेप घेत १,३२० दूध संस्‍थांबाबत तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेत न्‍यायालयात धाव घेतली. कोल्‍हापूर सर्किट बेंचने या संस्‍थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून ८० दिवसांत पात्र, अपात्रतेबाबत निर्णय घेण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार गेल्‍या अडीच महिन्‍यांपासून सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली. निकालपत्र तयार करण्‍याची प्रक्रिया सहायक निबंधक कार्यालयात सुरू आहे. दूध संस्‍थांचा निकाल देताना प्रामुख्‍याने ५० लिटर दूध संकलनाची अट, संस्‍थेचे लेखापरीक्षण आणि निवडणूक झाली आहे का, याबाबी तपासल्‍या जाणार आहेत. यामधील बहुतांश संस्‍थांचे संकलन ५० लिटरहून कमी असल्‍याचे चर्चा आहे. त्‍यामुळे पुढील आठवड्यापासून देण्‍यात येणार्‍या निकालपत्रांकडे गोकुळ वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

सात संस्‍थांची सुनावणी

यापूर्वी गैरहजर राहिलेल्‍या ३६ संस्‍थांना मंगळवारी सुनावणीस हजर राहण्‍यासाठी पत्र दिले होते. यापैकी केवळ सात संस्‍थांच सुनावणीला उपस्‍थित राहिल्‍या. तर २९ संस्‍थांनी दु्सर्‍यांदा पत्र पाठवूनही सुनावणीकडे पाठ फिरविली.

‘त्‍या’ २६७ संस्‍थांबाबत आज सुनावणी

तत्‍कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी २६७ संस्‍थांचे निकाल दिले होते. या प्रक्रियेवर प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेत सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्‍याकडे तक्रार केली होती. बेलवाडे यांच्‍या तक्रारीवर सुनावणी सुरू आहे. आज, बुधवारी (दि.१०) या संस्‍थांबाबत सुनावणी होणार आहे.

प्रशासक नियुक्‍तीवर आज, संचालक अपात्रतेबाबत उद्या सुनावणी

गोकुळच्‍या माजी संचालकांनी गोकुळवर नियुक्‍त झालेली प्रशासक नियुक्‍ती रद्द करण्‍यासंदर्भात कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आज बुधवारी (दि.१०) सुनावणी होणार आहे. तर संचालक अपात्रतेसंदर्भात बेलवाडे यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर उद्या, गुरुवारी (दि.११) सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news