

मुंबई : कोल्हापूरमधील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दररोज निर्माण होणाऱ्या २१४.१९ दशलक्ष लिटर घरगुती सांडपाण्यापैकी ६९.४९ दशलक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना पंचगंगा नदीपात्रात सोडले जात आहे, अशी धक्कादायक माहिती पर्यावरण व हवामान बदलमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली आहे.
काँग्रेसचे सतेज पाटील आणि भाई जगताप यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिका हद्दीत दररोज १४९.१ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी ४२.४ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत जाते. यासाठी ४९.५ दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. तर, इचलकरंजी महापालिका क्षेत्रात दररोज ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी ३८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि २ दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. भविष्यातील गरज लक्षात घेऊन येथे ३२.५ दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन एसटीपी उभारला जात आहे.
शिरोळ, कुरुंदवाड, हुपरी, हातकणंगले येथील ५.५ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प प्रस्तावित आहे. पंचगंगा खोऱ्यातील कारखाने, आसवणी, डेअरी व वस्त्रोद्योगातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर संबंधित उद्योगांकडे स्वतःच्या प्रक्रिया यंत्रणा कार्यरत आहेत. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासाठी संयुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही सुरू आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
एमआयडीसी क्षेत्राबाहेरील हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरात ६०९.५८ कोटी रुपये खर्चाचे तीन सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, जल अधिनियम, १९७४ अंतर्गत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई केली जात आहे.