'शिरोली ते उंचगाव रेल्वे पुलापर्यंत उड्डाणपूल करा' : पूरग्रस्त कृती समितीची एक दिवसीय लाक्षणिक उपोषणातून मागणी | पुढारी

'शिरोली ते उंचगाव रेल्वे पुलापर्यंत उड्डाणपूल करा' : पूरग्रस्त कृती समितीची एक दिवसीय लाक्षणिक उपोषणातून मागणी

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा पुलावर आज (दि. १०) पूरग्रस्त कृती समितीकडून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणातून महामार्गावरील शिरोली पुलाच्या भराव पुलाचे काम तात्काळ थांबवा आणि शिरोली ते उंचगाव रेल्वे पूलपर्यंतचा मार्ग उड्डाणपूल करा अशी मागणी करण्यात आली आहे.

पूरग्रस्त कृती समितीने आज (दि. १०) विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पंचगंगा पुलावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी बाजीराव खाडे यांनी बोलताना पुणे बेंगळूर महामार्गाच्या भरावामुळे कोल्हापूर शहरासह त्यामागील खेड्यांची पुराच्या पाण्यामुळे होणारी अवस्था अधिकाऱ्यांसमोर विषद केली. या रस्त्याबाबतचा कृती आराखडा सर्व लोकप्रतिनिधी समोर सादर करावा आणि मगच या रस्त्याचे काम सुरु करावे असे सांगितले. यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील म्हणाले या रस्त्याची बांधणी करताना पिलर पूल करून रस्ता करावा अशी सर्वपक्षीय बैठकीत मागणी केली आहे. पण खर्च वाढतो आहे म्हणून अधिकारी व संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे आता खपवून घेतले जाणार नाही. या पिलर पुलासाठी लागेल तो निधी लावून काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी केली. याची पूर्तता न केल्यास तीव्र जन आंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील( आबाजी ), करवीर चे माजी सभापती बी.एच पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, मार्केट कमिटी सभापती भारत पाटील-भुयेकर, पुलाची शिरोली सरपंच पद्मजा करपे, शिये सरपंच शितल मगदूम, वरणगे पाडळी सरपंच शिवाजी गायकवाड, शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील, वडणगे माजी सरपंच सचिन चौगले, हंबीरराव वळके,जयसिंग पाटील यासह सुमारे 40 पूरग्रस्त गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button