Kolhapur Unemployment Rate : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख बेरोजगार!

Kolhapur Unemployment Rate : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख बेरोजगार!
Published on
Updated on

कोल्हापूर; सुनील कदम : कोल्हापूर जिल्ह्यात बेरोजगार युवकांची संख्या राज्यात सर्वाधिक असल्याची बाब शासकीय आकडेवारीतूनच चव्हाट्यावर आलेली आहे. जिल्ह्यात 2 लाख 73 हजार 367 बेरोजगार युवकांची नोंदणी झालेली आहे; मात्र नोंदणी न झालेल्या बेरोजगार युवकांचे प्रचंड प्रमाण विचारात घेता हा आकडा जवळपास 8 लाखांच्या घरात असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (Kolhapur Unemployment Rate)

राज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार, राज्यातील नोंदीत बेरोजगार युवकांची संख्या 62 लाख 7 हजार 266 इतकी आहे. यापैकी मुंबईत 3 लाख 86 हजार 167, ठाण्यात 3 लाख 72 हजार 61, पुण्यात 4 लाख 72 हजार 40, औरंगाबादमध्ये 2 लाख 93 हजार 265, नागपुरात 2 लाख 97 हजार 171 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 73 हजार 367 बेरोजगार युवकांच्या नोंदी रोजगार केंद्राकडे आढळून येतात. या आकडेवारीवरून, पुणे, मुंबई आणि ठाण्यात सर्वाधिक बेरोजगार युवक असल्याचा समज होतो. मात्र, लोकसंख्येच्या निकषावर तपासले, तर कोल्हापूर जिल्ह्यातच बेरोजगारीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

मुंबईची आजची लोकसंख्या 2 कोटी 12 लाख 97 हजार इतकी आहे, त्यातुलनेत मुंबईतील बेरोजगारांचे प्रमाण केवळ 1.81 टक्के इतकेच येते. याच निकषानुसार, ठाणे 2.42 टक्के, नाशिक 3.88, नागपूर 5.58, पुणे 3.82 आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बेरोजगारीचे प्रमाण 6.18 टक्के इतके येते. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बेरोजगार युवकांचे प्रमाण तब्बल 6.41 टक्के आहे. राज्याच्या अन्य कोणत्याही जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याइतके बेरोजगारांचे प्रमाण आणि संख्याही नाही.

विशेष म्हणजे, बेरोजगारीचे हे प्रमाण केवळ शासनाकडे नोंदणी झालेल्या बेरोजगार युवकांचे आहे. शासनाकडे नोंदणीच न झालेल्या किंवा केलेल्या बेरोजगार युवकांचे प्रमाण यापेक्षा दुप्पट असण्याचा अंदाज आहे. ती आकडेवारी विचारात घेतली, तर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांचा आकडा पोहोचतो 8 लाख 20 हजारांवर! म्हणजे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या 19.24 टक्के जनता बेरोजगार आहे. अधिक सोप्या शब्दांत सांगायचे, तर आज जिल्ह्यातील दर पाच माणसांमागील एक माणूस बेरोजगार आहे, असे समजायला हरकत नाही.

कोल्हापूर जिल्ह्याच्या बेरोजगारीचा पट!

एकूण लोकसंख्या 42 लाख 62 हजार
नोंदीत बेरोजगार 2 लाख 73 हजार 367
बिगरनोंदीत बेरोजगारांची संख्या दुप्पट
एकूण बेरोजगार 8 लाख 20 हजारांवर
बेरोजगारीचे प्रमाण 19.24 टक्के
औद्योगिक विकासाअभावी वाताहत

राजकारण्यांचा कच्चा माल… बेरोजगारांचे तांडे!

कोल्हापूर शहरातील प्रत्येक राजकीय पक्षाकडे आणि सर्वच राजकीय नेत्यांकडे युवक कार्यकर्त्यांच्या पलटणीच्या पलटणी आहेत. हे दुसरे-तिसरे कुठले युवक नाहीत, तर ते बेरोजगारांच्या तांड्यातीलच आहेत. हाताला काम नसल्यामुळे या युवकांवर राजकीय नेत्यांच्या आगेमागे फिरून युवा कार्यकर्ता म्हणून मिरवण्याचे काम उरलेले आहे. जिल्ह्यातील हेच बेरोजगारांचे तांडे आजकाल बहुतेक सगळ्या राजकीय नेत्यांसाठी कच्चा माल म्हणून कामी येताना दिसताहेत. त्यामुळे आपला हा कच्चा माल कधी संपू नये म्हणून जिल्ह्यातील राजकीय नेतेच या भागात कोणतेही उद्योगधंदे येऊ देत नसावेत की काय, अशी शंका कुणाच्या मनात आल्यास ते वावगे ठरू नये, इतके त्यात साम्य आढळते.

राज्याच्या तुलनेत 12.88 टक्के बेरोजगार!

महाराष्ट्रात एकूण 62 लाख 7 हजार 266 नोंदणीकृत बेरोजगार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 73 हजार 367 बेरोजगारांची नोंदणी झालेली आहे. मात्र, नोंदणी झालेल्या बेरोजगारांपेक्षा नोंदणी न झालेल्या बेरोजगारांची संख्या याच्यापेक्षा दुप्पट असल्याचा अंदाज शासकीय यंत्रणांकडूनच वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा आकडा 8 लाखांच्याही पुढे जातो. ही आकडेवारी विचारात घेता, राज्याच्या तुलनेत कोल्हापुरातील बेरोजगारांचे प्रमाण 12.88 टक्के निघते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news