Jarange Patil : ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार तयार’, जरांगे पाटील यांचे कोल्हापुरात सभेत एकजुटीचे आवाहन | पुढारी

Jarange Patil : 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार तयार', जरांगे पाटील यांचे कोल्हापुरात सभेत एकजुटीचे आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे पाटील यांची आज (दि. १७) कोल्हापूरातील दसरा चौक येथे सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते. यावेळी बोलत असताना पाटील यांनी, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही एकजूट रहा असे आवाहन केले आहे.

माझी फक्त एकच तळमळ दडवून ठेवलेलं आरक्षण देऊन आम्हाला न्याय द्या. आरक्षणाचे पुरावे असतानाही पुरावे नाहीत असे सांगण्यात आले. आरक्षण मिळालं असतं तर मराठा जात सगळ्यात पुढे असती. आज लाखाने नोंदी सापडत आहेत. त्यामुळे आता लेकरांच्या पदरात आता मोठं यश पडणार आहे असं अश्वासन जरांगे पाटील यांनी दिले.

कोल्हापूर नगरीत एकच विनंती करण्यासाठी मी आलोय. आपल्याला चारही बाजूंनी घेरलं आहे. पण टप्प्यात आला की आता कार्यक्रम केला जाणार. मी मराठ्यांचा असल्याने कोणालाच भीत नाही. माझ्या जातीच्या जर कोणी आड आले तर सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी बोलत असताना पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देखील दिले. माझ्या सासरवाडीवरुन भुजबळ यांनी टीका केली. कोल्हापूरनगरीतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना एक निवेदन करतो की, त्यांना रोखा नाहीतर आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. विनाकारण दोन्ही समाजात तेढ निर्माण करु नये. आम्ही शांत आहोत शांतच राहू दे. सरकारने त्यांचं बोलायचं बंद करावं अशी विनंती देखील केली.

सगळ्यांना समजलेलं आहे आता की मराठा आरक्षण हे ओबीसीत गेले आहे. आरक्षण आता मिळणारच आहे. सरकार आरक्षण देण्याच्या तयारीत आहे. १ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरु करायचं. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. फक्त ताकदीने एकजूट राहा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

Back to top button