ऊसदर आंदोलन दडपण्याचे प्रयत्न हाणून पाडा; शाहूवाडीत राजू शेट्टी यांचे आवाहन

ऊसदर आंदोलन दडपण्याचे प्रयत्न हाणून पाडा; शाहूवाडीत राजू शेट्टी यांचे आवाहन
Published on
Updated on

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांचे ऊसदर आंदोलन दडपण्याचे सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही दडपशाही झुगारून देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात उतरून एकजुट दाखवावी, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे. शाहूवाडीत ठिकठिकाणी स्वाभिमानीच्या वतीने ऊसदराच्या मागणीसाठी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन स्थळांना माजी खा. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (दि. १७) दुपारी धावती भेट देऊन आंदोलक शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ऊसदर हिशोबाने मागितलेला आहे. तो अवास्तव नाही. चांगला ऊसदर हवा असेल तर ऊसतोडीसाठी चुळबूळ न करता शेतकऱ्यांनी संयम दाखवावा. विविध शेतकरी संघटनांनी उसदाराच्या मुद्द्यावर एकमत दर्शवून हा लढा एकीने लढण्याचे दिलेले संकेत शेतकरी चळवळीसाठी स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

शाहूवाडीतील या गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरील ठमकेवाडी फाटा, डोणोली, बांबवडे-पिशवी रस्त्यावरील बोरगे सॉ-मिल परिसर तसेच बांबवडे-कोकरूड रस्त्यावरील वाडीचरण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.१७) सकाळपासून एकाचवेळी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्र. ट. ४०० रुपये आणि यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊसदर प्र. ट. विनाकपात ३५०० रुपये मिळावेत या मागणीसाठी 'स्वाभिमानी'ने आंदोलन सुरू ठेवले आहे.

दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. पहिल्या टप्प्यात २५ हून अधिक साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारातून सुमारे ५२२ किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेकडे साखर कारखान्यांनी आणि सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ७ नोव्हेंबरच्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे साखर कारखान्यांच्या दारात अध्यक्षांसह, अधिकाऱ्यांना ऐन दिवाळीत खर्डा-भाकरीची शिदोरी देऊन आंदोलन करण्यात आले.

दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी बोलावलेल्या कारखानदार आणि शेतकरी संघटना पदाधिकारी यांच्या बैठकीत ऊसदराची कोंडी फुटण्याची अपेक्षा फोल ठरली. उलट या बैठकीत शेतकरी संघटनेच्या शिलेदारांना हिणवण्याचाच प्रकार घडला. याचाच परिपाक म्हणून राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात ठिय्या आंदोलन कायम ठेवले. त्याचवेळी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रमुख मार्ग आणि नाक्यांनाक्यावर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शाहूवाडीत तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, युवाध्यक्ष पद्मसिंह पाटील यांच्यासह स्वाभिमानीच्या लढवय्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला आंदोलनाची पूर्वकल्पना देत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन आरंभ केला. उसदराबाबतच्या मागण्या मान्य होईपर्यंत परिसरातील साखर कारखान्यांकडे होणारी ऊसाची वाहतूक रोखण्याच्या उद्देशाने हे ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर यांनी सांगितले.

अपेक्षित उसदाराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा दोन महिन्यांपासून लढा : राजू शेट्टी

"शेतकरी अचानक रस्त्यावर उतरलेले नाहीत. अपेक्षित उसदाराच्या मागणीसाठी दोन महिने लढा सुरू आहे. मात्र कारखानदार चकार शब्द बोलायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करून पहिल्यावर उसळत्या आंदोलनाच्या धास्तीने कारखानदार चर्चेसाठी वेळ मागू लागलेत. याचाच अर्थ याआधी झोपा काढत होते. याउलट जागृत झालेले शेतकरी कारखानदारांचा हिशोब चुकता करण्याच्या तयारीत आहेत."
– मा. खा. राजू शेट्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news