

प्रवीण ढोणे
राशिवडे : राज्यातील ऊस गळीत हंगाम संपून तीन महिने ओलांडले तरी 68 कारखान्यांकडून अद्याप 440 कोटींची एफआरपी अदा केलेली नाही. त्यामुळे या कारखान्यांवर सरकारकडून कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून राहीले आहे.
सध्या जुलै महिना सुरू असून गाळपासाठी पाठविलेल्या उसाची 68 कारखान्यांनी एफआरपी अदा केलेली नाही. अपेक्षित न झालेले गाळप, कर्जासह वाढलेले व्याज, थकलेले हप्ते, उत्पादन खर्चातील वाढ आणखी साखरेसह उपपदार्थांची अत्यल्प दरामध्ये होणारी विक्री यांचा ताळमेळ बसत नसल्याने कित्येक कारखाने एफआरपी अदा करण्यास हतबल बनले आहेत. त्यासाठी पुन्हा कर्जाची उपलब्धता होत नाही. राज्यात मागील गाळप हंगामत 200 पैकी 132 साखर कारखान्यांनी एफआरपी व त्याहीपेक्षा अधिक रक्कम दिली. मात्र 62 साखर कारखान्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक, तीन कारखानदारांनी 60 टक्क्यांपेक्षा कमी तर तीन कारखान्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली. शेतकर्यांचे पैसे न देणार्या 28 कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.