

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर झाला आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. शाल, श्रीफळ, १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळा वितरण तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले.
पुरस्काराचे यंदाचे नववे वर्ष असल्याचे सांगून डॉ. शिर्के म्हणाले, हा पुरस्कार आजपर्यंत व्यक्ती किंवा संस्थांना देण्यात आला आहे. यापूर्वी, शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव, रयत शिक्षण संस्था, निमति दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील, प्रा. डॉ. शिवाजीराव श्रीपती कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २०२४ चा पुरस्कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर झाला. पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांसाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी 'पुढारी'चे संस्थापक डॉ. ग. गो. जाधव यांचे मोलाचे योगदान होते, असे सांगून डॉ. शिर्के म्हणाले, १९८० पासून डॉ. प्रतापसिंह जाधव यांचेही विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीत मार्गदर्शन लाभले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने लता मंगेशकर यांना मानाची डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात लता मंगेशकर यांनी शिवाजी विद्यापीठात ललित कला विभाग नाही याची खंत वाटत असल्याचे सांगितले. ही बाब ध्यानात घेऊन डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुढाकार घेऊन ललित कला विभाग सुरू केला.
आज हा विभाग पूर्ण क्षमतेने सुरू याशिवाय देशातील आहे. पत्रकारितेतील पहिले डॉ. ग. गो. जाधव अध्यासन केंद्र उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ इमारत उभी न करता पत्रकारितेतील अद्ययावत ज्ञान या केंद्रात मिळावे, यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत ते सतत मार्गदर्शन करत असतात. शिवाजी विद्यापीठाच्या एकूणच सर्वांगीण विकासात डॉ. जाधव यांचे योगदान मोलाचे आहे, म्हणूनच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला कुलसचिव व्ही. एन. शिंदे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त विभागाच्या श्रीमती एस. एस. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. टी. गायकवाड, डॉ. सागर डेळेकर, डॉ. रामचंद्र पवार, प्राचार्य बाळासाहेब खोत, डॉ. शिवाजी जाधव उपस्थित होते.