कोडोली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोडोली (ता. पन्हाळा) येथील संतोष विश्वास चोपडे या तरुणाला 67 लाख 30 हजार रुपयांचा गंडा दाम्पत्याने घातला. याप्रकरणी राहुल गुलाबसिंग जाखड व गायत्री राहुल जाखड (दोघे रा. मूळ पारडी बडनेरा, जि. अमरावती, सध्या रा. वाकड, ता. मावळ, जि. पुणे) या दाम्पत्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
कोडोली पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत फिर्यादी संतोष चोपडे यांचा विश्वास संपादन करून राहुल जाखड यांनी विविध कंपन्यांत शेअर मार्केटमधून गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे चोपडे यांना आमिष दाखवविले. त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम तसेच बँकेमार्फत 74 लाख 30 हजार रुपये गुंतवून घेतले. त्यापैकी चोपडे यांना वारंवार मागणी केल्यानंतर केवळ 7 लाख रुपयांचा परतावा जाखड याने केला. उर्वरित 67 लाख 30 हजार रुपयांची रक्कम मागणी करूनही परत केली नाही. चोपडे यांना रक्कम मिळत नसल्याने जाखड दाम्पत्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
जाखड यांनी ऑक्सफिन कार्पोटेक, ग्रॅव्हिटी फॅसिलिटी मॅनेजमेंट या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून घेतली होती. जाखड यांच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी पुणे येथील वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जाखड दापत्य हे अमरावती, पुणेसह विविध ठिकाणी वास्तव करीत असल्याने अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.