65th Maharashtra State Drama Competition | ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

वेताळ मित्र मंडळाच्या वतीने ‘शपथ तुला या मंगळसूत्राची’ नाटकाने उघडला पडदा
कोल्हापूर : ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी महापौर रूपाराणी निकम,  परीक्षक ज्योती निसळ, मनोज खैरनार, श्रीनिवास एकसंबेकर, मिलिंद अष्टेकर, सुधीर पोटे, आमोद पटवर्धन आदी.
कोल्हापूर : ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, परीक्षक ज्योती निसळ, मनोज खैरनार, श्रीनिवास एकसंबेकर, मिलिंद अष्टेकर, सुधीर पोटे, आमोद पटवर्धन आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारी केशवराव भोसले नाट्यगृहात दिमाखात प्रारंभ झाला. महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. १६) यळगूड येथील वेताळ मित्र मंडळाच्या वतीने ‘शपथ तुला या मंगळसूत्राची’ हे नाटक सादर करण्यात आले. ९ डिसेंबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत विविध नाट्यसंस्थांची नाटके सादर होणार आहेत. उद्‌घाटनप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक सुधीर पोटे, रंगकर्मी आमोद पटवर्धन, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, परीक्षक ज्योती निसळ, मनोज खैरनार, श्रीनिवास एकसंबेकर, मिलिंद अष्टेकर आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायक सुधीर पोटे आणि रंगकर्मी आमोद पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ समीक्षक आणि पत्रकार उदय कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली.

उद्‌घाटनप्रसंगी महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या, कोल्हापुरात अनेक दर्जेदार आणि प्रतिभावान कलाकार आहेत. मात्र, त्यांच्या कलेला अपेक्षित व्यासपीठ आणि मोबदला मिळणे गरजेचे आहे. पुणे-मुंबईतील कलाकार कोल्हापुरात येऊन कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगले मानधन मिळवतात; मात्र स्थानिक कलाकार या बाबतीत मागे राहतात. कोल्हापुरातील विविध कलाक्षेत्रांतील कलाकारांनी एकत्र येऊन आपले सांस्कृतिक प्रयोग राज्यभर पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी कलाकारांसोबत लवकरच बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

सत्कारमूर्ती ज्येष्ठ शास्त्रीय गायक सुधीर पोटे म्हणाले, कोल्हापुरातील विविध कलांचे योग्य पद्धतीने दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे. येथील समृद्ध कला परंपरा, कलाप्रकार व कलाकारांच्या योगदानाची नोंद झाली, तर या कला पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. समन्वयक प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.