कोल्हापूर: टाकळीवाडी येथील शिवकालीन बुरुजासाठी शिवगर्जना संघटनेचे उपोषण | पुढारी

कोल्हापूर: टाकळीवाडी येथील शिवकालीन बुरुजासाठी शिवगर्जना संघटनेचे उपोषण

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील शिवकालीन ऐतिहासिक गढीचे ५ बुरुज ढासळून एकच बुरुज शिल्लक राहिला आहे. तो बुरुज मरणयातना भोगत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही याबाबत दुर्लक्षपणा होत असल्याने गावातील शिवगर्जना संघटनेने आजपासून (दि.९) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, बुरुजाबाबत प्रशासनने बुधवारपर्यंत कार्यवाही न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा शिवगर्जनाच्या उपोषणकर्त्यांनी दिला आहे. टाकळीवाडी येथील या बुरुजाची दगडे निखळू लागली आहेत. यातील माती बाहेर पडत आहे. हा राहिलेला एकमेव बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या ऐतिहासिक वास्तूची जपणूक व संवर्धन करून मजबुतीकरण करण्यासाठी गावातील शिवगर्जना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून निधीची मागणी केली आहे.

बुरुजाची जागा मोजणी लालफितीत अडकून पडल्याने शिवप्रेमींनी उपोषणाचे अस्त्र उपसत 30 ऑगस्टरोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, ग्रामपंचायतीने 14 सप्टेंबरपर्यंत मोजणी करू, असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही या बुरुजाच्या जागेची मोजणी झालेली नाही. याबाबत आणखीन काही दिवस थांबा, अशी तोंडावर पाने पुसण्याचा प्रकार ग्रामपंचायत प्रशासन करत आहे. मात्र, बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बुरुज वाचविण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात करत असल्याचे निशांत गोरे यांनी सांगितले.

या उपोषणात भरत सलगरे, श्रीमंदर एकसंबे, कृष्णा कोळी, दत्तात्रय बदामे, निलेश वनकुरे, सुधीर मोरे, लक्ष्मण चिगरे आदी सहभागी झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button