

आशिष शिंदे
कोल्हापूर : डंपिंग ग्राऊंडवर साचणार्या विनाप्रक्रिया कचर्याचा डोंगर दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. या डोंगरात 6.54 लाख मेट्रिक टन घातक कचर्याची दरवर्षी भर पडते. यामध्ये ई-कचरा, प्लास्टिक आणि जैववैद्यकीय कचर्याचा समावेश आहे. यातील बहुतेक कचर्यावर भूसमाधान व भस्मीकरणाची प्रक्रिया होत असली, तरी हे प्रमाण एकूण कचर्याच्या तुलनेत कमी आहे. या कचर्याच्या डोंगरामुळे राज्यात काही ठिकाणी डंपिंग ग्राऊंडलाच आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास येथे तयार होणारा मिथेन वायू आणि झिरपणार्या लिचेटमुळे हा कचर्याचा डोंगर ज्वालामुखी बनून कधीही उद्रेक घडवून आणू शकतो.
राज्यात 2024 साली 6.54 लाख मेट्रिक टन घातक कचरा निर्माण झाला. यातील बहुतेक कचर्यावर भूसमाधान व भस्मीकरणाची प्रक्रिया झाली असली, तरी लक्षणीय प्रमाणात कचरा अजूनही अपुराच व्यवस्थापित होतो. याशिवाय दररोजचा 4,746 मे. टन विनाप्रक्रिया नागरी कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर जातो. त्यात कमी-अधिक प्रमाणात घातक कचरादेखील टाकला जातो. विनाप्रक्रिया नागरी कचरा जेव्हा थेट डंपिंग ग्राऊंडवर जातो, त्यात ओला-सुका, प्लास्टिक, टायर, कपडे, कागद, रबर व काही प्रमाणात घातक कचरा मिसळलेला असतो. ओल्या कचर्याच्या कुजण्याने मिथेन तयार होते. उन्हाचा प्रखरपणा किंवा छोटी ठिणगी मिळाली की आग पेट घेते. याशिवाय घातक कचर्यातील सॉल्व्हेंटस्, ऑईल, रसायने, ई-कचर्यातील बॅटर्या उष्णता निर्माण करतात. त्यामुळे स्वतःहून आग लागण्याचा धोका असतो. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, डंपिंग ग्राऊंडला लागणार्या आगीचा धूर 10 ते 15 कि.मी. अंतरापर्यंत नागरिकांना श्वसन समस्या निर्माण करू शकतो. झिरपणार्या द्रव्यामुळे डंपिंग ग्राऊंडपासून किमान 2 ते 5 कि.मी. परिसरातील भूजल दूषित होते.
डंपिंग ग्राऊंडला आग लागली की, विषारी धूर मोठ्या प्रमाणावर हवेत पसरतो. यात कार्बन मोनॉक्साईड, डायऑक्सिन्स, फ्युरान्स, सल्फर डायऑक्साईड यासारखे घातक वायू असतात. हा धूर आजूबाजूच्या वस्तीवर दाट पसरतो. यामुळे श्वसनाचे आजार, दमा, ब्राँकायटिस आणि डोळ्यांची जळजळ यामुळे नागरिकांचे आरोग्य थेट धोक्यात येते.
डंपिंग ग्राऊंडमध्ये पावसाचे पाणी साचल्यावर कचर्यातून लेड, मर्क्युरी, कॅडमियम, आर्सेनिक यासारखे धातू आणि अमोनिया, नायट्रेटसारखी रसायने झिरपत खाली जातात. हा काळसर द्रव भूजलात मिसळून विहिरी, बोअरवेल आणि तलाव दूषित करतो. एक लिटर लिचेट हजारो लिटर प्रदूषित बनवू शकते.