

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या महाविअधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. गांधी मैदान येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी अब की बार ४५ पार असा नारा दिला.
गेली कित्येक वर्षे काँग्रेस सरकारला जे जमलं नाही ते मोदी सरकारने करुन दाखवले आहे. अनेक उद्योग आणलेले आहेत. राम मंदिराचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं होतं ते या सरकारने पूर्ण करुन दाखवलं आहे. राज्यातही आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत. आरोग्य विभागामार्फत आपण अनेकांपर्यंत पोहोचलो आहोत. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना आणलेल्या आहे. आज आपला निर्धार करायचा आहे राज्याचा विकास करण्याचा, शिवसेना बळकट करण्याचा, विरोधकांना चारी मुंड्या चीत करण्याचा असं म्हणत आगामी निवडणूकीत आपलाच विजय होणार असा विश्वास दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा जिंकायचा आहेत. प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदीजी हेच आपले उमेदवार आहेत असे समजून पूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे आदेश यावेळी सगळ्यांना दिले. पीएम मोदींचा देशातील अब की बार ४०० पार असा नारा आहे. त्याच धरतीवर आधारित राज्यातला आपला अब की बार ४५ पार असा नारा असणार अशी घोषणा सीएम शिंदे यांनी केली.