कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर ग्रामपंचायतीने नळ कनेक्शनसाठी ज्यादा पैसे मोजल्याने न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करण्याचा इशारा जहांगीर सनदी या ग्रामस्थाने दिला. सनदी यांच्या या इशाऱ्यानंतर नळ कनेक्शन जोडणी हा विषय चर्चेत आला आहे.
याबाबत जहांगीर सनदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खिद्रापूर येथील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून जल जीवन योजनेच्या ठेकेदाराकडून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. या पाईपलाईन मधून जुन्या नळ कनेक्शन धारकांना नवीन नळजोडणी 900 रुपये खर्च मोजावे लागले. यावरुन जहांगीर सनदी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ग्रामस्थांकडून नळ कनेक्शनकरिता ज्यादा पैसे घेतले जात आहेत असा आरोप सनदी यांनी केला. त्यामुळे याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सनदी यांनी सांगितले. त्याचबरोबर या रकमेच्या कथित अपहाराची सखोल चौकशीची मागणी देखील ग्रामस्थांमधून केली जात आहे.