

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. आय स्मार्ट कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एक ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी मंदिराच्या बाह्य परिसरातील ६४ योगिनींच्या दगडी शिल्पाकृतींसह परिसराची स्वच्छता करण्यात आली.
दगडी शिल्पांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी साध्या पाईपद्वारे नियंत्रित पाण्याचा वापर केला. मंदिरातील जतन-संवर्धनच्या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार पाण्याचा वेग नियंत्रित ठेवण्यात आला. बाह्य परिसर झाडून पाण्याने स्वच्छ करण्यात येत असून, यासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शनरांग, मांडव आणि एआय सुरक्षा
मुख्य दर्शनरांगेचे काम सुरू झाले आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेतली असून येथे एआय सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. ऊन-पावसापासून संरक्षण करण्यासाठी पत्रे आणि कापडी मांडव उभारले आहेत. मुखदर्शनाच्या ठिकाणीही मांडव उभारणी सुरू आहे.
नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम
भक्तिगीत, भजन, नृत्य आणि शास्त्रीय नृत्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी दिली.
विशेष पूजा-अलंकारांची तयारी
घटस्थापना, ललितापंचमी, अष्टमी, खंडेनवमी आणि दसऱ्याला विशेष पूजा व सोहळे होणार आहेत. दररोज पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. सोमवारपासून पालखीची स्वच्छता तसेच अंबाबाईच्या सोने-चांदीचे दागिने आणि प्रभावळीची स्वच्छता सुरू केली जाणार आहे. गरुड मंडपाचे काम सुरू असल्याने अलंकारांची स्वच्छता अभिषेक सभामंडपात केली जाणार आहे. तयारीला सोमवारपासून अधिक वेग येईल, अशी माहिती व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.
नवरात्रौत्सव तयारी
१ ऑक्टोबरपासून स्वच्छता मोहीम; आय स्मार्टचे १२ कर्मचारी कार्यरत.
६४ योगिनींच्या दगडी शिल्पांची साध्या पाईपने काळजीपूर्वक स्वच्छता.
शेतकरी संघाच्या इमारतीत एआय सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम.
विद्युत रोषणाईसाठी इलेक्ट्रिक कामाची जोडणी सुरू
भाविकांसाठी मुख्य दर्शन मार्ग आणि ऊन-पावसापासून संरक्षणासाठी मांडव उभारणी.
सोमवारनंतर पालखी, सोने-चांदीचे अलंकार आणि प्रभावळीच्या स्वच्छतेचे नियोजन