कोल्हापूर : अनंत चतुर्थीनंतर टाकळीवाडीत शिवप्रेमींचे उपोषण; ऐतिहासिक बुरुजाच्या पुनरुज्जीवनाची मागणी | पुढारी

कोल्हापूर : अनंत चतुर्थीनंतर टाकळीवाडीत शिवप्रेमींचे उपोषण; ऐतिहासिक बुरुजाच्या पुनरुज्जीवनाची मागणी

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथील शिवकालीन ऐतिहासिक गढीचे 5 बुरुज ढासळून एकच बुरुज शिल्लक राहिला आहे. या बुरुजाच्या तोडीचे दगड निखळून पडत आहेत. पुरातत्व विभाग, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षपणामुळे या बुरुजाला भग्नावस्था प्राप्त झाली आहे. या बुरुजाचे पुनुरूजीवन करण्यासाठी युवकांची धडपड सुरू आहे. शिवगर्जना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

बुरुजाची मजबूतीकरण जागा मोजणीच्या लालफितीत अडकून पडल्याने शिवप्रेमींनी 30 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र ग्रामपंचायतीने 14 सप्टेंबर पर्यंत मोजणी करू असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही या बुरुजाच्या जागेची मोजणी झालेली नाही. याबाबत प्रशासन गंधाऱ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शिवगर्जनाचे सदस्य निशांत गोरे यांनी केला आहे. शिवरायांच्या इतिहासाची जपणूक आणि हा वारसा टिकवून ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. याबाबत प्रशासन गांभीर्य घेत नसल्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनंत चतुर्थी नंतर आमरण उपोषण करणार असल्याचे शिवगर्जना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

टाकळीवाडी, अकिवाट या दोन गावामधील ६ पैकी ५ बुरुज नामशेष

टाकळीवाडी, अकिवाट या दोन गावाच्या मध्ये 6 शिवकालीन बुरुजाची गढी होती. या गढीचे 5 बुरुज नामशेष झाले आहेत. यातील एक बुरुज इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे. या बुरुजाचे दगड निखळू लागले आहेत. यातील माती बाहेर पडत आहे. हा राहिलेला एकमेव बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या ऐतिहासिक वास्तूची जपणूक व संवर्धन करून मजबुतीकरण करण्यासाठी शिवरायांचा वारसा जोपासण्याचा विढा गावातील शिवगर्जना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उचलला आहे. बुरुजासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून निधीची मागणी केली आहे. प्रशासनाने हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी ॲक्शन मोडची भूमिका घेणे गरजेचे आहे.

Back to top button