कोल्हापुरात आज दहीहंडीचा थरार | पुढारी

कोल्हापुरात आज दहीहंडीचा थरार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा, गोपाळकालानिमित्त गुरुवारी शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. गुरुवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवयास मिळणार आहे. शहराच्या विविध भागांत या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने शहरवासीयांना ढोल-ताशे, झांज पथकांसह विविध नृत्य पथकांच्या कार्यक्रमांची मेजवानी मिळेल.

धनंजय महाडिक युवा शक्तीतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. दसरा चौकातील या दहीहंडीसाठी तीन लाख रुपयांचे बक्षीस आहे. सहा थर लावून सलामी देणार्‍या संघास 10 हजार, तर सात थर लावून सलामी देणार्‍या संघास 15 हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. महाद्वार रोड येथे न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे ‘गुजरीचा गोविंदा’ ही दहीहंडी आयोजित केली आहे. या ठिकाणी एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे; तर ‘झीरो डिग्री’ या नृत्य पथकाचा कार्यक्रमही होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे दुपारी तीन वाजता मिरजकर तिकटी येथे निष्ठा दहीहंडी आयोजित केली आहे. या ठिकाणी एक लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस आहे.

गोकुळ दूध संघातर्फे पितळी गणपती येथे दहीहंडी आयोजित केली आहे. मनसेची दहीहंडी गुजरी कॉर्नर येथे होणार आहे. सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. न्यू संयुक्त शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोल्हापूर धान्य व्यापारी असोसिएशनतर्फे लक्ष्मीपुरी येथे दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. रंकाळा परिसरातील इस्कॉन मंदिरातही दहीहंडीचे आयोजन केले आहे.

Back to top button