कासारवाडी: पुढारी वृत्तसेवा: नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील बस थांब्याजवळ असलेल्या पोवार बंधुंच्या होलसेल किराणा दुकानाला आज (दि.२७) लागलेल्या भीषण आगीत इमारतीसह दुकानातील साहित्य जळून खाक झाले. सुमारे ७१ लाख १७ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ५ तासांच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.
येथील सुरेश पोवार व सुनिल पोवार बंधुंची पोवार बझार, बचत बझार नावाची दोन मोठी होलसेल व रिटेल किराणा मालाची दोन दुकाने आहेत. आज सकाळी सात वाजता दुकानाला आग लागली. घटनास्थळी वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, माजी सरपंच प्रकाश देशमुख, उपसरपंच राम जाधव, यांच्यासह शेकडो नागरिकांनी धाव घेतली. दुकानातील खाद्य तेलाने पेट घेतल्याने धुरांचे प्रचंड लोळ उठले होते. आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी वडगाव नगर परिषदेच्या सहा तर वारणा कारखान्याच्या चार अग्निशमन दलाच्या बंबांनी आग आटोक्यात आणली.
पेठ वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक बी. बी. पाटील, वाठारचे मंडळाधिकारी अमित लाड, तलाठी शैलेश कुईंगडे, प्रमोद भोरे, आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
हेही वाचा