

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : इन्शुरन्स कंपनीकडून विमा मिळवणेकरिता खोटा मोटार अपघात दाखवून तपास केल्याप्रकरणी व फसवणूक केल्याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्याच्या पोलीस हवालदारासह सहा जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा अन्वेषण शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
कुर येथील संजय बाबुराव खोत (वय वर्षे 46) हा मद्य प्राशन करून २४ मे २०१९ रोजी बुलेट मोटरसायकल वरून प्रवास करत असताना आदमापूर येथील निढोरी फाट्याजवळील ओढ्यावर मोटरसायकल स्लिप होऊन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. असे असताना मृताचे उत्पन्नानुसार विमा कंपनीकडून संजय खोत यांची पत्नी श्रीमती रूपाली, मुलगा अमेय उर्फ अमित, वडील बाबुराव सदाशिव खोत यांना विम्याची रक्कम ज्यादा मिळविण्याच्या हेतूने तपासी अंमलदार भिकाजी बचाराम देसाई यानी खोटा तपास केला.
विजय शंकर पाटील रा. मडिलगे बुद्रुक याच्या मोटरसायकलवर पाठीमागे बसून प्रवास करीत असताना कुत्र्यांच्या घोळक्यात पाठीमागे बसलेला संजय खोत हा रस्त्यावर पडून झालेल्या अपघातात मरण झाला असा खोटा तपास केला.
याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक भाग्यश्री पाटील यांनी या प्रकरणाची फिर्याद भुदरगड पोलिसात दिली असून पोलीस हवालदार भिकाजी बचाराम देसाई, रूपाली खोत, अमेय उर्फ अमित खोत, बाबुराव खोत (सर्व रा. कुर), विजय शंकर पाटील (रा. मडिलगे बुद्रुक), प्रसाद शामराव पाटील (रा. सरवडे, ता. राधानगरी) या सहा जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.