कोल्हापूर : शिंपे येथील सानियाला नेपाळमधील आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक | पुढारी

कोल्हापूर : शिंपे येथील सानियाला नेपाळमधील आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

सरूड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील शिंपे येथील धावपटू सानिया संपत पाटील हिला नेपाळ (फोकरा) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

युथ गेम्स फेडरेशनच्या वतीने नुकतीच ही मैदानी खेळ स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतासह, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान या देशातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारी सानिया पाटील १९ वर्षांखालील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली होती. तिच्या या सुवर्ण कामगिरीने शाहूवाडी सारख्या डोंगराळ, ग्रामीण मातीतील क्रीडा गुणवत्तेला पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे. सानिया पाटील ही चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त ए. बी. नाईक महाविद्यालयाची (कला शाखा) विद्यार्थिनी असून महाराष्ट्र महारेस्क्यू फोर्स (कोल्हापूर) चे दयानंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ती धावण्याचा सराव करते. भारत देशातर्फे ऑलम्पिकमध्ये सहभागी होऊन देशाला पदक मिळवून देण्याचे सानियाचे स्वप्न आहे. आमदार मानसिंगराव नाईक, संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी सुवर्णपदक विजेत्या सानियाचे खास अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी तसेच प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button