दिवाळी : प्रकाशपर्वाला आजपासून प्रारंभ | पुढारी

दिवाळी : प्रकाशपर्वाला आजपासून प्रारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली,
उटण्याचा स्पर्श सुगंधी!
फराळाची लज्जत न्यारी,
रंगावलीचा शालू भरजरी !
आली आली दिवाळी आली…

प्रकाशपर्व असे महत्त्व असणारा दिवाळीचा सण यंदा 6 दिवसांचा असणार आहे. याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने सोमवारी (दि. 1 नोव्हेंबर) गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसने होत आहे. मंगळवारी (दि. 2) धनत्रयोदशी व धन्वंतरी जयंती, बुधवारी अमावास्या, गुरुवारी (दि. 4) नरकचतुर्दशी व लक्ष्मी-कुबेर पूजन होणार आहे. शुक्रवारी (दि. 5) दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा आणि शनिवारी (दि. 6) भाऊबीज होणार आहे.

गतवर्षी कोरोना महामारीमुळे दिवाळीचा सण प्रतीकात्मक व अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे दिवाळीचा सण जल्‍लोषात साजरा करण्यासाठी तयारी घरोघरी पूर्ण झाली आहे.

वसुबारसने आजपासून प्रारंभ

दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून वसुबारसला महत्त्व आहे. सोमवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ होत आहे. निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक असणारे आणि पिकांचे उंदरापासून रक्षण कणारे सर्प, दूध-दुभते देणारी व शेतीसाठी उपयुक्‍त ठरणार्‍या बैल, म्हैस, गाय या प्राण्यांबद्दल ऋण व्यक्‍त करणारा सण म्हणून वसुबारसला महत्त्व आहे.

धनत्रयोदशी-नरकचतुर्दशी,लक्ष्मी-कुबेर पूजन दिवाळी सणातील धनत्रयोदशी व धन्वंतरी जयंती मंगळवारी (दि. 2) आहे. या दिवशी वहीपूजन होणार आहे. बुधवारी अमावास्या असून गुरुवारी (दि. 4) दीपावलीचा मुख्य दिवस आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही दीपावलीतील महत्त्वाच्या नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजनाचा योग गुरुवारी पुन्हा एकत्र जुळून आला आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नान झाल्यावर देव व आई-वडिलांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वत्र समृद्धी व्हावी याकरिता पणत्या लावल्या जातात. यानंतर देवाला फराळ व गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजनाचा सोहळा होतो.

पाडवा, भाऊबीज आणि पांडव पंचमी दरम्यान, यंदाच्या दिवाळी सणात शुक्रवारी (दि. 5) दीपावली पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा असून शनिवारी (दि. 6) भाऊबीज आहे. मंगळवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी पारंपरिक पांडव पंचमी होणार आहे. या सर्व सणांचीही जय्यत तयारी घरोघरी करण्यात आली आहे.

Back to top button