विशाळगड परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग; कासारी धरण ७६.२३ टक्के भरले, पांढरपाणी- पावनखिंड, आंबा घाट मार्गावर झाडांची पडझड | पुढारी

विशाळगड परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग; कासारी धरण ७६.२३ टक्के भरले, पांढरपाणी- पावनखिंड, आंबा घाट मार्गावर झाडांची पडझड

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : विशाळगड परिसरात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असून कासारी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ७६.२३ टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात १९६ मिमी इतका पाऊस झाला. जूनपासून आज (दि. २३) अखेर २०२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५९.८९ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून पाणीपातळी ६०८ मी इतकी झाली आहे. धरणाच्या वीज गृहातून प्रतिसेकंद ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात होत आहे. सध्याची पूर परिस्थिती पाहता प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे बळीराजा भात रोप लावणीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात अनेक घरांच्या भिंती पडून नुकसान झाले आहे.

यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली आहे. जून महिना कोरडाच गेला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तुरळक पावसाला सुरुवात झाली. मशागतीच्या कामासह रोपलावणीची कामे खोळंबली होती. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असताना पावसाने बरसायला सुरुवात केली. त्यामुळे विशाळगड परिसरातील शेतीच्या कामांना गती आली. गेली चार-पाच दिवस परीसरात मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने नाले, ओढे दुथडी वाहू लागले आहेत. परिणामी कासारी नदीच्या उगमस्थानापासून गेळवडे (कासारी) धरणापर्यंत अनेक नाले, ओढे यातून पाणी धरणक्षेत्रात येऊ लागल्याने जून अखेर १५ टक्के इतका खालावलेला पाणीसाठा रविवारी (दि. २३) सकाळी ७६ टक्के झाला आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने खोळंबलेली रोपलावण अंतिम टप्प्यात आहे.

मुसळधार पावसामुळे पांढरपाणी- पावनखिंड तसेच आंबा-विशाळगड घाट दरम्यानच्या मार्गावर अनेक झाडाच्या फांद्या तसेच झाडे उन्मळून, कोलमडून पडली आहेत. गडाच्या कड्या कपारीतून अनेक धबधबे वाहू लागले आहेत. गडावर चढताना पायरीमार्गावरून पाणी वाहत असल्याने पर्यटक, भाविकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच ढासळलेल्या बुरुजाचे दगड कोसळत असल्याने येथील परिसर धोकादायक बनला आहे. पावसाला विलंब झाला असला तरी गतवर्षीची सरासरी गाठली आहे. गतवर्षी याच दिवशी परिसरात २१७२ मिमी पाऊस झाला होता. तो आज २०२३ मिमी इतका आहे. त्यामुळे समाधानकारक वातावरण आहे.

तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. भेंडवडे येथील जयवंत यशवंत आगलावे, राजाराम रंगराव आगलावे, सुशीला संपत आगलावे, उखळूपैकी अंबाईवाडा येथील बयाबाई बाबू येडगे, यांच्या घराच्या भिंती पडून नुकसान झाले. शित्तुर तर्फे वारुण येथील लिलाबाई अर्जुन पाटील यांच्या राहत्या घराची भिंत विमल गोपाळ पाटील व श्रीपती ज्ञानु पाटील यांच्या संडास बांधकाम वर पडून त्यांचेही नुकसान झाले आहे. सरूड येथील ताराबाई शामराव नांगरे यांचीही भिंत पडली आहे. वारुळ येथील मदन महाजन व पांडुरंग देसाई याच्या हॉटेलमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे हॉटेल मधील साहित्याचे नुकसान झाले आहे. शारदा सर्जेराव तडवळेकर, मलकापूर यांच्या राहत्या घराची भिंत पडून, डोणोली येथील सयाजी जलदू सातपुते यांची दगड, वीट, मातीची भिंत पडली. मरळे महेश बापू कांबळे, मौजे येलुर येथे बंडू कृष्णा गुरव यांच्या घराची भिंत पडली आहे. मलकापूर येथील कुंभार गल्लीत तानाजी सावंत यांच्या बंद घराची भिंत पडली आहे. या सर्वांच्या घराची भिंत पडून तसेच काहींच्या हॉटेलमध्ये पुराचे पाणी शिरून सुमारे २ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती शाहूवाडी आपत्ती नियंत्रण कक्षातून राजेंद्रकुमार नंदूरे यांनी दिली.

Back to top button