

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी (दि. 23) लक्ष्मीपुरीतील व्यापार्याकडून सहा हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याप्रकरणी एस. एस. अग्रवाल अँड सन्स या दुकानमालकाकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेतर्फे एकल वापर प्लास्टिकबंदी मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिकबंदी मोहिमेंतर्गत लक्ष्मीपुरीतील एस. एस. अग्रवाल अँड सन्स या दुकानाची तपासणी केली. या तपासणीत व्यापार्याकडे सुमारे 6,000 किलो प्लास्टिकच्या वस्तू आढळल्या. आरोग्य विभागाने 2 ट्रॅक्टर सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू असणारे 33 बॉक्स व 8 पोती प्लास्टिक जप्त केले. जप्त प्लास्टिक कसबा बावडा घनकचरा प्रकल्पामध्ये प्लास्टिक श्रेडिंगद्वारे विल्हेवाट लावण्यासाठी पाठविले. शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, शुभांगी पवार, विनोद कांबळे, सौरभ घावरी, मुकादम व कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कापडी, कागदी पिशव्यांचा वापर करावा. व्यापार्यांनी ग्राहकांना स्वतःची पिशवी घेऊन येण्याची विनंती करावी अथवा नाममात्र शुल्कात पर्यावरणास अनुकूल पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.