Kolhapur robbery: जेमतेम चार मिनिटांत लुटली 60 किलो चांदी

कोल्हापूर-मुंबई अंगडिया बस दरोडा : वाहकानेच टिप दिल्याचे उघड; महामार्ग सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
Theft
TheftPudhari
Published on
Updated on
राजकुमार बा. चौगुले

पेठवडगाव : राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर रात्रीच्या वेळी लूटमारीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः, विश्रांतीसाठी रस्त्याकडेला थांबणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करून चाकू, कोयता अथवा लोखंडी सळईचा धाक दाखवत बारीकसारीक लुटी केल्या जात असल्याची अनेक प्रकरणे घडल्याने वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईला जाणाऱ्या बसमधील अंगडिया चांदी दरोड्याचा गेम तर जेमतेम चार मिनिटांत करण्यात आला. ते आले, गळ्याला चाकू लावला आणि तब्बल 60 किलो चांदी पोत्यात भरून निघूनही गेले. विशेष म्हणजे, वाहकानेच दरोडेखोरांना टिप दिल्याचेही उघड झाले आहे.

महामार्गावरील हॉटेल परिसर, निर्जन जागा, उड्डाणपुलाखालील भाग तसेच टोल नाक्यांपासून काही अंतरावर रात्रीच्या सुमारास लुटीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. झोपलेले चालक व क्लीनर, तसेच एकटे प्रवास करणारे वाहनधारक गुन्हेगारांचे सहज लक्ष्य ठरत आहेत. मोबाईल फोन, रोख रक्कम, डिझेल, बॅटरी, टायर, ताडपत्री व वाहनातील लहानसहान साहित्य चोरण्यावर गुन्हेगारांचा भर असतो. अनेकवेळा भीतीपोटी चालक तक्रार देत नाहीत. काही प्रकरणांत मारहाण व गंभीर धमकी देऊन लूट केल्यानंतर गुन्हेगार पसार होतात. त्यामुळे महामार्गांवरील अशा घटनांची अधिकृत नोंद कमी असली, तरी प्रत्यक्षात असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे चित्र आहे.

सोमवारी रात्री कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी अशोक ट्रॅव्हल्सची आराम बस अंगडिया पार्सल घेऊन निघाली होती. तावडे हॉटेल परिसरात तीन संशयित बसमध्ये चढले. बस किणी हद्दीत आल्यानंतर तिघेजण मागील सीटवरून पुढे येत चालकाच्या केबिनमध्ये घुसले. त्यातील एकाने पिशवीतून कोयता काढून क्लीनरच्या (वाहक) मानेवर धरत चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले. त्याचवेळी बाहेर दुचाकीवर थांबलेले इतर साथीदारही बसमध्ये घुसले. दरोडेखोरांनी फिर्यादी व क्लीनरला मारहाण करून बसमधील सुतळी बारदानातील 34 किलो चांदी, प्लास्टिक पोत्यातील 26 किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, 10 ग््रॉम सोन्याचे दागिने, मोबाईल हँडसेट व काही रोख रक्कम, असा सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला आणि पसार झाले. अवघ्या चार मिनिटांत घातलेला हा दरोडा महामार्गावरील भीषण स्थिती दर्शवणारा ठरतो.

ट्रकचालकांच्या म्हणण्यानुसार, रात्री सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसणे, अपुरी गस्त व निर्जन पट्टे याचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करताना चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलीकडील दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महामार्गांवरील गस्त वाढवली असली, तरी बारीकसारीक लुटी थांबत नसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news