

शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथील कलेश्वर हायस्कूल शेजारील जनवाडे पाणंद रस्त्यावरील सुमारे ५०ते ६० एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. ऊसाचे क्षेत्र सलग लागून असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
ऐन ऊस तोडणी हंगामाच्या तोंडावर ही घटना घडली आहे. तोडणीला आलेला इतक्या मोठ्या प्रमाणातील क्षेत्रातील ऊस खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. येथील गट नं.१०११ते१०२० मधील ऊस जळाला आहे. दरम्यान इचलकरंजी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या याठिकाणी दाखल झाल्या .मात्र रस्त्याअभावी अग्निशामक दलाचे कर्मचारी व उपस्थित शेतकऱ्यांना आग आटोक्यात आणता आली नाही.
रविवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान अचानक ऊसाच्या फडाला आग लागली. यावेळी आगीने रौद्र रूप धारण केले होते. बघता बघता अनेक एकरात आग पसरली. सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते. ऊस तोडून व पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. काहीजण शॉर्टसर्किट आग लागली असावी असा तर काहीजण उसाला मुद्दाम आग लावली असावी, असा संशय शेतकरी आणि ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
यामध्ये संतोष पाटील, शिरीष पाटील, प्रकाश चौगुले, प्रकाश पाटील टाकवडेकर, अशोक पाटील, रघुनाथ पाटील, रावसाहेब मतपटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.