Mushrif gave a clue earlier : मुश्रीफांनी ‘त्या’ बॅनरमधून आधीच दिला होता क्ल्यू? शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील सहभागानंतर चर्चेला उधाण | पुढारी

Mushrif gave a clue earlier : मुश्रीफांनी ‘त्या’ बॅनरमधून आधीच दिला होता क्ल्यू? शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील सहभागानंतर चर्चेला उधाण

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात रविवारी (दि. २) मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबरोबरच राष्ट्रवादीतील प्रमुख शिलेदारांनी त्यांच्यासोबत मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या. यातील प्रमुख नाव अर्थात माजी मंत्री व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आ. हसन मुश्रीफ यांचे आहे.

मुश्रीफ यांनी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मतदार संघात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम जोरदारपणे राबविला होता. या कार्यक्रमांच्या जाहिरात फलकांवर अपेक्षेप्रमाणे शरद पवार, अजित पवार यांच्या छबी होत्याच. मात्र याशिवाय थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छबीही छापल्याने या फलकांची मोठी चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो न वापरता दोन्ही पवारांसोबत त्यांनी शिंदे व फडणवीस यांचे फोटो वापरल्याने उलटसुलट चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर राज्य शासनाचे अभियान असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांचे फोटो वापरले त्यात गैर काय, असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला होता.

मात्र रविवारी (दि. २) मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग नोंदविल्याने ते फलक पुन्हा चर्चेत आले आहेत. त्या फलकांतून मुश्रीफ यांनी सत्तेत सहभागी होण्याचा जणू क्ल्यूच दिला होता का? अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे. मागील काही महिन्यांच्या काळात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करीत ईडीची चौकशी लावली होती. मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांना चौकशीच्या फेर्‍यात घेरण्यात आले होते. आता मुश्रीफ हे थेट शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत.

दरम्यान, कागल मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर जल्लोष करीत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तळागाळातील जनता व कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता पुन्हा मंत्री झाल्याचा आम्हाला आनंदच असून, त्यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे विकासाला बसलेली खीळ दूर होईल, असे मत गडहिंग्लजमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Back to top button