पंढरीच्या वाटेवर शाहूवाडी स्‍वराज्‍य प्रतिष्‍ठानकडून ‘आरोग्‍य वारी’; डॉक्‍टरांकडून वारकऱ्यांची मोफत चिकित्‍सा | पुढारी

पंढरीच्या वाटेवर शाहूवाडी स्‍वराज्‍य प्रतिष्‍ठानकडून 'आरोग्‍य वारी'; डॉक्‍टरांकडून वारकऱ्यांची मोफत चिकित्‍सा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा दिंड्या पालख्यांचे आगमन झाले की, सर्वांना वेध लागतात ते पंढरीच्या आषाढी वारीचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीची वाट धरतात. या अचाट गर्दीचा ओसंडून वाहणारा उत्साह दुणावणारा असला तरी, पायी निघालेल्या वारकऱ्यांना वाटचालीत एखादी इजा किंवा आजारपण उद्भवल्यास वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध व्हावी. यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान-स्वराज्य दिव्यांग सेना शाहुवाडीतर्फे रविवार दि २५ रोजी घाणंद येथे डॉ झुंजार माने आणि त्यांच्या चमूने पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांची नि:शुल्क चिकित्सा केली.

अनवाणी पायी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजे परमेश्वराचीच सेवा होय. भूक, वेदना, पीडा, वय, आजार कसलीही पर्वा न करता हे भक्तगण पायपीट करतात. अशा माऊलींना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी मेडिकल कॅम्प पार पडला. शिबीरात मुख्यत्वे शारीरिक आजार, जलजन्य आजार, त्वचारोग, जखमा व इतर आजारांवर उपचार करण्यात आले. औषधांसोबतच, वेदनाशामक तेलाच्या बाटल्या वारकऱ्यांना मोफत पुरवण्यासह अनेकांना पायाला मालिशही करून दिली.

माऊलीच्या सेवेसाठी तत्पर – 

पंढरीच्या वारीला पायी येणाऱ्या वारकऱ्याना सांधेदुखी, पायाला सूज येणे, रक्तदाब वाढणे आदींसह इतर संसर्गजन्य आजाराची लागण होण्याची भीती असते. मात्र, वारीदरम्यान औषधपाण्याची सोय दुर्लभ असल्याने वारकऱ्यांची अडचण होते. ही बाब हेरून शाहूवाडी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य सेवा पुरवुन वारकऱ्यांची सुश्रूषा करण्यात आली.

डॉ झुंजार माने, अध्यक्ष, स्वराज्य प्रतिष्ठान शाहूवाडी

Back to top button