कोल्हापूर : बालिंगा दरोडा : महत्त्वाचे धागेदोरे हाती; दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर- गगनबावडा महामार्गावर बालिंगा येथील मध्यवर्ती चौकात कात्यायनी ज्वेलर्सवर पडलेल्या दरोडा प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. तपास पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर परिसरातील स्थानिक टिप्परच्या मदतीने दरोडेखोराने हा थरार घडविला असल्याची माहिती आज (शनिवार) विश्वसनीय सूत्रांकडून समजली, मात्र पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. संशयित दरोडेखोर कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची शक्यता आहे पुढे येत आहे. उद्या रविवार सकाळपर्यंत दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश होईल असेही वरिष्ठ सूत्राकडून समजते.
सराफी दुकानात आणि दुकानाबाहेर तसेच रस्त्यावर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांचे नावही चौकशीतून पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर बालिंगा येथील मध्यवर्ती चौकात गुरुवार दिनांक आठ जून रोजी दुपारी दोन वाजता दरोडेखोरानी रमेश माळी यांच्या कात्यायनी ज्वेलर्स या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकून दोन कोटीपेक्षा अधिक रकमेचे सोन्याचे दागिने आणि दोन लाखांची रोकड लंपास केली होती.
दरोडेखोराने केलेला गोळीबार आणि हल्ल्यात मालक रमेश माळी आणि त्यांचा मेव्हणा जितू माळी एक गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी जितू माळी यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरोडेखोराने दागिन्याने भरलेली पिशवी घेऊन दुचाकीवरून गगनबावडा मार्गे जाताना बालिंगा येथील मध्यवर्ती चौकासह महामार्गावर ठिकठिकाणी गोळीबार करून प्रचंड दहशत माजली होती.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करून कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग तसेच सीमा भागात शोध मोहीम राबविली होती. गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने काल पोलिसांचे हाती लागली होती. तपासाची व्याप्ती वाढविल्यानंतर संशयित दरोडेखोरांचा कोल्हापूर पोलिसांना छडा लागला असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत दरोडेखोरांच्या टोळीचा भांडाफोड होईल अशीही शक्यता वरिष्ठ सूत्राकडून व्यक्त करण्यात येत आहे.