कोल्‍हापूर : दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र परत पडले कोरडे... | पुढारी

कोल्‍हापूर : दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र परत पडले कोरडे...

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीचे पात्र परत कोरडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी विहिरी, कूपनलिका, बोअरवेल आदींचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या उन्हाचा तडका वाढल्याने शेतीसाठी पाण्याची गरज वाढली असताना नदीपात्र कोरडे पडल्याने पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागात यंदा वळीव पावसानेही दडी दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

फेब्रुवारी ते जून पर्यंत या पाच महिन्यात दूधगंगा नदी पात्रात पाणी कमी वेळ राहिले आहे, तर अधिक काळ दूधगंगा नदीपात्र कोरडेच पडले आहे. नदीपात्र वारंवार कोरडे पडत असल्याने व उन्हाचा तडाका ही वाढल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी हक्काचे सोयाबीन पिकाचीही अद्याप पेरणी केली नाही. काळ्ळमावाडी धरणातून दूध गंगा नदी पात्रात नियमानुसार ठरलेल्या वेळेत पाणी सोडल्यानंतर ठिकठिकाणी कर्नाटक व महाराष्ट्राच्या हद्दीत अनेक गावात पाणी अडवले जाते व तेथून पाणी ओव्हर फ्लो होऊनच दुसऱ्या गावात जाते. त्यामुळे फारच कमी पाणी दूध गंगा नदीवरील शेवटच्या गावात पोहोचते. आलेले पाणीही साठवून ठेवण्याची ठोस उपाययोजना येथील ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली नाही.

दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दत्तवाड – मलिकवाड व दत्तवाड – एकसंबा या बंधाऱ्याजवळ पाणी अडवण्यासाठी बसवण्यात आलेले बर्गेही ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे बर्गे घालूनही मोठ्या प्रमाणात त्याला लिकेज असल्याने पाणी अधिक काळ साठवून राहू शकत नाही. यासाठी पाटबंधारे खात्याने व दत्तवाड ग्रामपंचायतने सदर बर्गे नवीन घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांची उंची ही वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून जितके पाणी नदीपात्रात येत आहे ते साठवून अधिक काळ त्याचा पुरेपूर वापर करता येऊ शकतो.
इचलकरंजीला पाणी द्या म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी दुधगंगा नदीची ही अवस्था पहावी. कोणतीही मोठी योजना कार्यान्वित नसतानाही दूधगंगा नदी वारंवार कोरडी पडत आहे, तर या योजना कार्यान्वित झाल्या तर काय होईल ? याचा अभ्यास करावा.

महिला वर्गातून रोष…

दूधगंगा नदी वारंवार कोरडी पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. विशेषतः महिला वर्गांला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महिला वर्गातून प्रशासना विरोधात रोष निर्माण होत आहे. इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी कसे देता ते पाहू? अशी तिखट प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत एक थेंब ही दूधंगेतून पाणी इचलकरंजीला घेऊ द्यायचे नाही अशी भूमिका व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button