कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात आज बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणार्या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यातच या ठिकाणी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.
छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते याच्यामध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यावेळी जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी महापालिका चौक, शिवाजी चौक या रोडवर प्रचंड धापवळ झाली.
दरम्यान महापालिका चौकात जमाव आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिस्थिती स्फोटक बनली. यावेळी पोलिसांच्या लाठीचार्जमुळे धापवळीत चौकात चपलांचा खच पडला आहे. यावेळी वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनाही पोलिसांचा लाठीमार बसला. दरम्यान, श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही या घटनेचा फटका बसला.