कोल्‍हापूर : वळीवाकडून फसगत, मान्सूनही लांबल्‍याने शेतकरी संकटात

कोल्‍हापूर : वळीवाकडून फसगत, मान्सूनही लांबल्‍याने शेतकरी संकटात
Published on
Updated on

सरुड : पुढारी वृत्तसेवा मान्सूनपूर्व वळीव पावसाने फसगत केली असताना आता मान्सून देखील लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटा उमटू लागल्या आहेत. आकाशात ना ढगांची गर्दी, ना मोसमी वाऱ्याची झुळूक वरून सूर्याच्या प्रखर तेजामुळे पेरणी वाया जाण्याची भीतीही सतावतेय. एकीकडे थोडेफार बी पेरलेलं वाया जाईल ते जाईल, शिवाय शेतात उभे पीक जगवायचं कसं ? अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जणू हुडहुडी भरल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

पावसाच्या या दडणीमाडणीत खरीप पीक पेरणीला खो बसला आहे. शाहूवाडी तालुक्याचा विचार करता एकूण सुमारे १० हजार हेक्टर खरिप क्षेत्रापैकी पूर्व भागातील सरुड, भेडसगांव या विशेषतः बागायती पट्टयातील केवळ १ हजार हेक्टरवर धुळवाफ अर्थात कुरीने भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. तर पश्चिमोत्तर भागातील सुमारे ६ हजार हेक्टरवरील रोप लावणीसाठी आवश्यक भाताचा तरवा (नर्सरी क्षेत्र) शेतकऱ्यांनी मातीआड केला आहे. शिवाय बांबवडे, पिशवी खोऱ्यातील जवळपास ३ हजार हेक्टरवरील खरीप (भात, भुईमूग, हायब्रीड, सोया, नागली आदी) पीक पेरणी पावसाच्या हवाल्यावर खोळंबलेल्या अवस्थेत आहेत. साहजिकच चिंतातुर शेतकरी वर्ग मोठ्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्रास हेच चित्र दिसत आहे.

दरम्यान वारणा आणि कडवी धरणाच्या पाणीसाठ्यावर देखील पावसाच्या अनपेक्षित विलंबाचा प्रतिकूल परिणाम उद्भवण्याची शक्यता आहे. वारणा (चांदोली) धरणात ५ टीएमसीहून अधिक तर कडवी धरणात ०.८० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरण प्रशासनाच्या मते सद्यातरी लाभक्षेत्राला पाणी दुर्भिक्ष्याची चिंता नाही. मात्र, एकही वळीव पावसाचा शिडकावा झालेला नाही आणि मोसमी पावसाचीही कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. त्यातच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिकांच्या पाण्याच्या (तहान) पाळीत वाढ झाली आहे. एकंदर पाण्याची गरज पाहता वारणा धरणातून ०.१२ टीएमसी पाणी दिवसाकाटी लाभक्षेत्रात खपते आहे. म्हणजेच आठवड्याला १ टीएमसी पाणीसाठा कमी होणार आहे. या गणितशास्त्रानुसार पाच आठवडे पुरेल इतका वारणा प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक आहे.
'आयएमडी'च्या निरीक्षण नोंदीनुसार १५ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापणार असल्याचे सांगितले जात असले तरी 'अलनिनो' तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रभाव दृष्टिपथात नाही. त्यामुळे मान्सूनचा प्रगतीपथ अडखळत आहे, ही वस्तुस्थिती पाहता पाऊसकाळ आणखी पुढे जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी आहे.

कर्नाटकला पाणी देण्यास नकार !

दरम्यान वारणा (चांदोली) धरण प्रशासनाकडे कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झालेला नाही. किंवा पाऊस कधी पडेल याचा नेमका अंदाज बांधता येत नसल्याने लाभ क्षेत्रातील संभाव्य अडचण ओळखून सद्यस्थितीत वारणा धरणातून पाणी देणे शक्य नसल्याचे कर्नाटक पाटबंधारे प्रशासनाला कळविले असल्याचे सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news