कोल्हापूर : विशाळगड 'मुंढा दरवाजा'चे दगड निखळले | पुढारी

कोल्हापूर : विशाळगड 'मुंढा दरवाजा'चे दगड निखळले

विशाळगड, सुभाष पाटील :  शिवकालीन किल्ले विशाळगड येथील पर्यटकांचा सेल्फी पॉईंट व गडाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या मुंढा दरवाजाचे दगड निखळू लागल्याने दरवाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तरी पुरातत्व विभागाने निखळणाऱ्या दगडांची डागडुजी करून मुंढा दरवाजा सुरक्षित करावा, अशी मागणी गडवासीय, पर्यटक, भाविक आणि इतिहास प्रेमींतून होत आहे.

शिवकाळात गड चढताना सात दगडी कमान्या पार करतच गडावर जावे लागत. मात्र काळाच्या ओघात सर्वच कमान्यांची पडझड झाली आणि त्यापैकी एक कमानी म्हणजे ‘मुंढा दरवाजा’. पडझडीत असतानाही हा दरवाजा तग धरून होता. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गडाचा ऐतिहासिक बाज कमी होऊन बहुतांश वास्तू, बुरुज, मंदिरे, कमान्या यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. काही वास्तू नष्ट झाल्या. काहींचे अवशेष शिल्लक आहेत. परिणामी गड दुरावस्थेत विळख्यात सापडला होता. विशाळगडाच्या दुरावस्थेबाबत दै ‘पुढारी’ ने वारंवार आवाज उठवून पाठपुरावा केल्याने गडावरील बहुतांश कामाला निधी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मुंढा दरवाजासाठी सुमारे ५७ लाखांचा निधी मिळाला.

मुंढा दरवाजाच्या डागडुजीचे काम २०१६ साली पूर्ण करण्यात आले. दरवाजाच्या उभारणीने गडाच्या नैसर्गिक सौदर्यात ऐतिहासिक वैभवाची भरच पडली. ‘स्फूर्तिदायी इतिहासाला साजेसे काम झाल्याने इतिहास व निसर्ग प्रेमींबरोबरच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण नावारुपाला आले. संपूर्ण काम दगडी करण्यात आले आहे. परिणामी इतिहासाला उजाळा मिळाला. येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कुटुंबासह येत असतात. यात लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. काही हुल्लडबाज तरुणांची टोळकीही येथे येतात. त्यांच्याकडून मोबाईल सेल्फीसारखे प्रकार सुरुच असतात.

 दरवाजाच्या ऐतिहासिक बाजामुळे पर्यटकांची संख्या दुप्पट वाढली. हे ठिकाण पर्यटकांचे सेल्फीचे, गर्दीचे ठिकाण बनले. मात्र अलीकडे दरवाजाचे दगड निखळू लागले आहेत. एक-एक दगड निसटत असल्याने सात कमानी पैकी एक उरलेली कमान म्हणजे हा दरवाजा पुन्हा पडझडीच्या विळख्यात सापडतोय की काय, अशा प्रतिक्रिया पर्यटक, भविकांतून व्यक्त होत आहे.

दरवाजाच्या उभारणीने इतिहासाला उजाळा मिळाला आहे. काही पर्यटक दरवाजावर नावे लिहून विद्रुपीकरण वाढवताना दिसतात. काही थेट दरवाजावर चढत असल्याने एक-एक दगड निखळून धोका निर्माण झाला आहे. दरवाजा दरीलगत असल्याने पर्यटकांचा पाय घसरून कपाळमोक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाने त्वरित दखल घेऊन दरवाजाची दुरुस्ती करावी आणि दरीलगत संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button