

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये कोणतेही अधिकार नसताना सरपंच पती कुलदीप कदम यांनी मनमानी कारभार करत सभेपुढील कागदपत्रके हाती घेऊन ती फाडून टाकत ग्रामपंचायत अधिनियमांचा भंग केला. कागद पत्रकांची फाडाफाड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. तशी मासिक सभेच्या इतिवृत्तावर नोंद ग्रामसेवकांनी घेतली आहे. कोपेश्वर मंदिराची प्रतिमा असणारे लेटर पॅड फाडून अवमान केला आहे. तरी सरपंच पती कदम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा खिद्रापूरचे ग्रामस्थ रामगोंडा पाटील यांनी निवेदनाद्वारे कुरुंदवाड पोलीस ठाण्याला दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू असताना पुरातत्त्व खात्याला पाठविण्यात येणाऱ्या पत्रावर चर्चा सुरू होती. सरपंच पती कदम हे सभा सुरू असताना बेकायदेशीरपणे सभागृहात येऊन पत्र काढून घेऊन ते फाडाफाडी केली. याचा जाब काही ग्रा.प सदस्यांनी विचारला त्यांनाही दांडगावशाही करत उडवा उडवीची उत्तरे कदम यांनी दिली.
सरपंच व ग्रामसेवकांच्या सह्या असलेले आणि कोपेश्वर मंदिराची प्रतिमा असणारे लेटर पॅड फाडून मंदिराचा अवमान केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ग्रामपंचायतीचे शासकीय पत्र फाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणे व अडथळा निर्माण करणेसह आदी गुन्हे त्यांनी केले आहेत. तरी कुलदीप कदम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.