

कोल्हापूर : रत्नागिरी येथून कोल्हापुरात एम. डी. ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. अरमान करीम खान (वय २७, रा. माजगाव रोड, कोकणनगर, रत्नागिरी) असे त्याचे नाव असून, त्याच्या ताब्यातून ५५ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, मोबाईल, स्पोर्टस् बाईक असा ३ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापुरातील कँडी नावाचा खरेदीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
विक्रमनगर परिसरात एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी रत्नागिरी येथील एक तरुण येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यांनी या परिसरात सापळा रचून अरमानला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्यामध्ये १ लाख ६६ हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज मिळून आले. तो कोल्हापुरातील कँडी नावाच्या संशयिताला हे ड्रग्ज देणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. मात्र, पोलिस कारवाईची चाहूल लागताच कँडी पसार झाला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.