'घरात मल्ल व दारात वळु' हे बिरुद अभिमानाने मिरवणार्या शेतकर्याचा बैल न्यायालयीन व क्लिष्ट कायदे प्रक्रियेत अडकल्याने, शेतकर्यांच्या आयुष्यातील बैल व बैलांच्या शर्यतीना असलेले सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व वादात अडकले होते. बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षाची परंपरा आहे. पारंपरिक संस्कृतीचा वारसा व शेतकर्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने जुलै २०११ मध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० चा आधार घेऊन, अध्यादेश काढून, बैलांचा समावेश राजपत्रात (गॅझेट) केल्यामुळे बैलांचे मनोरंजनाचे खेळ करण्यास बंदी आलेली होती. याच गॅझेटचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मे २०१४ मध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यतीवर संपूर्ण देशांमध्ये बंदी घातली होती. परंतु यामध्ये पशुतज्ञांचा अहवालच निर्णायक ठरल्याने आता गावोगावी बैलगाडी शर्यतींचा धुरळाच उडणार आहे.