Kolhapur : वारणा नदीत पोहण्यासाठी गेलेला एकजण बुडाला | पुढारी

Kolhapur : वारणा नदीत पोहण्यासाठी गेलेला एकजण बुडाला

शित्तूर वारूण; पुढारी वृत्तसेवा : उखळू (ता. शाहुवाडी) येथील लक्ष्मण किसन कांबळे (वय ५१) यांचा वारणा नदीत पोहताना पाण्यात बुडाले. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज बुधवारी (दि. १७) सकाळी अकराच्या दरम्यान लक्ष्मण कांबळे हे सुरेश कांबळे, धनाजी कांबळे, भगवान कांबळे ह्या मित्रांसमवेत उखळू येथील वारणा नदीवर पोहायला गेले होते. नदीत पोहण्यासाठी त्यांनी सुळ मारली. त्यानंतर ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली जाऊ लागले. सहकाऱ्यांना वाटले ते पाण्यात पोहत असावेत. मात्र ते खाली वाहू लागल्यानंतर ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात आली. लक्ष्मण कांबळे हे नदीत बुडाल्याची बातमी समजताच ग्रामस्थांनी नदीकिनारी धाव घेतली. अंधार पडेपर्यंत गावकऱ्यांनी संपूर्ण परिसराचा नदीकाठ पालथा घातला मात्र त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व पोलिस हवालदार दाखल झाले होते.

उखळू येथे आज व उद्या असे दोन दिवस महामानवांच्या संयुक्त जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी लक्ष्मण कांबळे हे मुंबईवरून आजच सकाळी गावी आले होते. कार्यक्रमाच्या संदर्भातील मंडळाची मीटिंग संपवून ते आपल्या मित्रांसमवेत वारणा नदीवर पोहायला गेले होते. त्याच वेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे संपूर्ण परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button