कोल्हापूर : पूरबाधित तालुक्यांचे शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करा | पुढारी

कोल्हापूर : पूरबाधित तालुक्यांचे शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीत योग्यरीत्या नियंत्रण ठेवता यावे, याकरिता पूरबाधित तालुक्यांचे येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी तहसीलदारांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठक झाली.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, येत्या 1 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू होणार असून याचा 1077 हा टोल फ्री क्रमांक राहणार आहे. पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी जे अतिरिक्त साहित्य लागेल, त्याची शुक्रवारच्या बैठकीत तहसीलदारांनी मागणी करावी. डोंगरी भागात विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याने ‘दामिनी अ‍ॅप’द्वारे संबंधित यंत्रणा व नागरिकांनी कार्यरत राहावे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण म्हणाले, पूरबाधित नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ या पंचायत समितीमध्ये, गोसरवाड उपकेंद्र, कवठे बुलंद व सर्व तालुका कार्यालयांमध्ये पूरबाधित नागरिकांकरिता बफर स्टॉक स्वरूपात औषध साठा असून बाधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी रेशन, औषधसाठाही पुरेशा प्रमाणात करावा. नागरिक व पशुधन सुरक्षित राहण्यासाठीचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सुमारे 690 गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवरून असल्याने पूर कालावधीत नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याचे नियोजन ग्रामपंचायतीने आत्तापासूनच करावे.

पूरबाधित गावांमध्ये यापूर्वी नागरिकांसाठी देण्यात आलेले

लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोट आदींची पूर्व चाचणी घेण्यात यावी, जेणेकरून आपत्ती कालखंडामध्ये अडचण येणार नाही. आपत्ती संदर्भातील व्हॉटस् अ‍ॅप किंवा ई-मेलवरून जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या पत्राची एक कॉपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला देण्यात यावी, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केली.

या आढावा बैठकीसाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे) रोहित बांदिवडेकर, एमएसईबीचे कोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांच्यासह आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, महावितरणसह इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष, तर पूरबाधित तालुक्यातील तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी हे दूरद़ृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

अधिकार्‍यांनी आपापसात समन्वय ठेवावा

जिल्ह्यात सध्या काही नवीन अधिकारी बदलून आले असून त्यांनी पूरस्थिती बाधित गावांची त्वरित बैठक घ्यावी. आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकार्‍यांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवावा. कोणीही हलगर्जीपणा करू नये. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी रेखावार यांनी बैठकीत दिला.

Back to top button