कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; युवकाला 10 वर्षांचा कारावास | पुढारी

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; युवकाला 10 वर्षांचा कारावास

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करणार्‍या गौरव सतीश कांबळे (वय 27, रा. न्यू पॅलेस, रमणमळा, कोल्हापूर) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी 10 वर्षे सक्तमजुरी व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.

सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी कांबळे याला दहा वर्षे सक्तमजुरी व 25 हजारांचा दंड तसेच पीडिता, तिचे आई, वडील व भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन वर्षे कारावास व 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्हीही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत.

धमकी देऊन अत्याचार

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, गौरव कांबळे याचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. यातून त्याची 15 वर्षीय मुलीशी ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत त्याने मुलीला आपल्या घरी बोलावून लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करताच तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.

मुलगी गर्भवती

या घटनेनंतर मुलीच्या पोटात दुखू लागले. पालकांनी तिला उपचारांसाठी नेले असता तपासणीत ती साडेतीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आई, वडिलांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात कांबळे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

खटल्याच्या निकालाकडे लक्ष

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. कुलकर्णी यांनी 8 साक्षीदार तपासले. फिर्यादी, संबंधित मुलगी व पंचांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने कांबळे याला दोषी ठरवून कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. खटल्याच्या निकालाकडे रमणमळा, कसबा बावडा परिसराचे लक्ष लागले होते.

Back to top button