कोल्हापूर : ‘करणी’च्या संशयातून खून : टेंबलाई नाक्‍यावर थरार; हल्‍ल्‍यात महिला गंभीर | पुढारी

कोल्हापूर : ‘करणी’च्या संशयातून खून : टेंबलाई नाक्‍यावर थरार; हल्‍ल्‍यात महिला गंभीर

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा घरावर ‘करणी’ केल्याच्या संशयातून मद्यधुंद अवस्थेतील निखिल पिंटू गवळी (वय 22, रा. टेंबलाई नाका) या तरुणाने घरात घुसून केलेल्या तलवार हल्ल्यात आझाद मकबूल मुलतानी (48, रा. टेंबलाई नाका, झोपडपट्टी) हे जागीच ठार झाले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या सासर्‍याला वाचविण्याच्या प्रयत्न करणार्‍या अफसाना असिफ मुलतानी (22) या त्यांच्या सुनेवरही गवळीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अफसाना या गंभीर जखमी झाल्या आहेत. गजबजलेल्या टेंबलाई नाका चौकात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता ही थरारक घटना घडली.

हल्लेखोर निखिल गवळी हा रात्री उशिरा स्वतःहून पोलिसांत हजर झाला. मध्यवर्ती चौकात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांसह बघ्यांची घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हल्लेखोराने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. रात्री उशिरा रक्ताने माखलेली तलवारही पोलिसांनी जप्त केली. तरुणाने केलेल्या हल्ल्यात आझाद यांचा जागीच मृत्यू झाला, तर सून अफसाना ही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी व सीपीआर रुग्णालयात गर्दी केली होती.

मूळचे खडकलाट येथील आझाद मुलतानी यांचे कुटुंबीय टेंबलाई नाका परिसरात 15 वर्षापासून राहतात. मुलतानी हे सेंट्रिंग काम करतात. त्यांच्या घराशेजारी राहणारा निखिल गवळी हा तरुण टेम्पोचालक आहे. त्याला दारु आणि अमली पदार्थाचे व्यसन आहे. व्यसनाधिन गवळी हा चौकात राहणार्‍या नागरिकांना शिवीगाळ करणे,अंगावर धाऊन जाणे असे प्रकार करत होता. त्याच्या या वागणूकीने नागरिक त्रस्त झाले होते. आझाद मुलतानी व त्याचे कुटूंबिय आपल्या घरावर करणी करतात. घराच्या दिशेने लिंबू फेकतात. या कारणातून निखिल गवळी त्यांच्यावर डूख धरुन होता. यावरुन त्यांच्यात वादावादी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंगळवारी रात्री 8.30 वाजता आझात मुलतानी, पत्नी रेहाना (वय 42), सुन अफसाना (वय 22) व आयेशा (वय 20) यांच्या समवेत घरात जेवत होते. यावेळी संशयीत निखील गवळी हातात तलवार घेऊन त्यांच्या घरात घुसला. माझ्या घरावर करणी करताय काय ? असा सवाल करत त्याने आझाद मुलतानी यांच्या पाठीवर, छातीवर व हातावर तलवारीने सपासप वार केले. छातीवर झालेल्या वर्मी हल्यामुळे आझाद कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या सासर्‍याला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या सुन अफसाना हिच्यावरही त्याने सपासप वार केले.

कुटुंबियातील अन्य व्यक्तींनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधारातून पसार झाला. या घटनेनंतर आझाद यांची मुले आसिफ आणि तौसिब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रिक्षातून शासकीय रुग्णालयात हलविले मात्र आझाद यांचा जागीच मृ्त्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री 9.30 वाजता हल्लेखोर निखील गवळी रक्ताळलेल्या तलवारीसह राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.
अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, पोलिस उप अधिक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळासह परिसरात रक्ताचे थारोळे साचले होते. भिंतीवर तसेच जेवनासाठी वाढलेल्या ताटावर रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या दिसून येत होत्या.

हल्लेखोराची दहशत

निखील गवळी हा पूर्णतः व्यसनाधिन होता. त्याची परिसरात प्रचंड दहशत होती. आझाद मुलतानी याच्या घरालगतच त्याचे घर आहे. परिसरातील नागरिकांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे नागरिक रात्री 8 नंतर स्वतःच्या घराचे दरवाजे बंद करुन घेत असत.

हल्लेखोराचे कुटुंब पसार

आझाद मुलतानी कुटुंबियावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण होते. प्रक्षुब्ध जमावामुळे निखील गवळी याचे कुटुंबीय तेथून पसार झाले होते. या घटनेत निखीलसह त्याच्या आणखी कोणा साथीदाराचा समावेश असावा का याची पोलिस चौकशी करत होते.

Back to top button