शाहूवाडीत वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा ! | पुढारी

शाहूवाडीत वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा !

बांबवडे/सरुड : पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्याचा नागरी भाग वगळता पश्चिमोत्तर डोंगर, दऱ्याखोऱ्यातील वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. वाढत्या उन्हाच्या प्रभावामुळे खळाळते नैसर्गिक जलस्त्रोत, झरे आता पूर्णपणे आटत चालल्याने येथील धनगरवाडे, वस्त्यांवरील भूमीपूत्र स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर आजही पाणीटंचाईच्या झळा सोसतो आहे. पावसाळ्यात याच भागात धो-धो पाऊस पडतो, यथावकाश ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुढे येऊ लागते. मात्र, हेच पावसाचे पाणी अडविण्यासाठी मर्यादित अपवाद वगळता प्रयत्नच न झाल्याने इथले पाणीटंचाईचे भूत इतक्या वर्षांनंतरही मानगुटीवर कायम आहे. जानेवारी महिन्याच्या पुढे उन्हाळा सरकू लागतो तसतसे ओघळ, ओढे, नाले, झरे यासारखे उपजत जलस्त्रोत कोरडे पडत जातात आणि पाणीटंचाईचे भीषण वास्तव नेहमीच समोर येते. या नैसर्गिक विरोधाभासाबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात हात आखडता घेणाऱ्या शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा बेजबाबदार कोतेपणा ठळकपणे पुढे आल्यावाचून राहत नाही.

भाडळे गावात सद्या डोंगराच्या पायथा परिसरातील (आवळी अथवा बांबवडे) गावांतून पिण्याचे पाणी बैलगाडी अथवा उपलब्ध वाहनातून वाहून न्यावे लागत आहे. इथला तलाव बहुतांश आटला आहे. उर्वरित थोडेफार दूषीत पाणी आणि वाडी लगतच्या कृषीसिंचन योजनेवर जनावरांची तहान भागवली जात आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाच्या दक्षिणेकडील जिरायती बहुल गावे कमीअधिक प्रमाणात वर्षानुवर्षे हाच अनुभव घेत आहेत.

भाततळी, पांढरेपाणी, येळवण जुगाई पैकी धनगरवाडा हा भाग तसा कासारी प्रकल्पाच्या (गेळवडे धरण) उशापायशाला वास्तव्य करणारा असूनही पाणीटंचाईच्या फेऱ्यातून सुटू शकलेला नाही. विशेषतः धरणामुळे विस्थापीत जिणे वाट्याला येऊनही धरणातील पाण्याचा थेंब या नागरिकांच्या नशिबी नाही, हे केवढे मोठे दुर्दैव.

भाततळी वस्तीचे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात डोळ्यासमोर घेतल्यास पाणी दुर्भिक्ष्याची दाहकता लक्षात येते. सायपनने आणलेल्या सार्वजनिक नळावर प्रत्येकी आठ-दहा घरं मिळून सकाळ, दुपार, संध्याकाळ असे आळीपाळीने पिण्याचे पाणी भरतात. जनावरे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न विचारता इथली मायबाप लोकं आसवांचा आवंढा गिळून व्यवस्थेवरुद्ध संताप व्यक्त करताना दिसतात.

सद्या जनावरांसह नागरिकांना अर्धीगिर्धी तहान भागवून पुढची वाट चालावी लागत आहे. यदाकदाचित अवकाळी पाऊसच झाला नाही तर रोजच्या वापरासाठी आणि पिण्यासाठी लागणारे पाणी आणायचे कुठून? हा प्रश्‍न या ग्रामस्थांना अस्वस्थ करून सोडत आहे. साहजिकच इथला लोंबकळलेला पाणीप्रश्न आणि त्यातून पोटापाण्याची धगधगणारी आग लोकांच्या स्थलांतराला कारणीभूत ठरली आहे.

म्हाळसवडे या सुमारे हजारभर लोकवस्तीला सद्या कुपनलिकेचा आधार मिळाला आहे. यावरच कशीबशी तहान भागविणारे येथील ग्रामस्थ, ‘कधीतरी एमआय टँक सारखी उपाययोजना होईल आणि पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, शेतीभाती पाण्याखाली येईल आणि रोजगारासाठीची भटकंती थांबेल’, या आशाळभूत नजरेने सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत.

अंबाईवाडा धनगरवाड्यावरील जनतेला अर्धा किलोमीटर पायवाटेने पायपीट करून झऱ्याच्या पाणीसाठप्यावर विसंबून राहावे लागत आहे. माणगांव पैकी कारंडेवाडीला खाजगी अधिग्रहित कूपनलिकेतून पाणीपुरवठा सुरू आहे. अमेणीला गांव विहिरीचे खोलीकरण करूनही पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतोच आहे. इथली सव्वा कोटींची प्रस्तावित जलजीवन मिशन नळपाणी योजना बारगळल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या उत्तरदायित्वाचे कोडेच?

शाहूवाडी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील २ गावे आणि २३ वाड्यांना उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता गृहीत धरून संबंधित गाव आणि वस्त्यांसाठी प्रस्तावित उपाययोजनांचा १५ लाख ९५ हजार रुपये अपेक्षित निधीचा पाणीटंचाई निवारण आराखडा शिफारशीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविला आहे. मुळातच इथल्या पाणीपुरवठा विभागाची सूत्रे जिल्हा मुख्यालयातून हलतात. त्यामुळे तालुक्याची सरासरी भूजलपातळी घटली किंवा वधारली याच्याशी किंबहुना तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्नी हा विभाग कितपत उत्तरदायित्व निभावतो? हे तालुक्यातील जनतेला पडलेले कोडेच आहे.

Back to top button