Bidri Sugar Factory Election : बिद्री साखर कारखाना निवडणूकीत रंगली बिद्रीच्या चिमणीची चर्चा! | पुढारी

Bidri Sugar Factory Election : बिद्री साखर कारखाना निवडणूकीत रंगली बिद्रीच्या चिमणीची चर्चा!

मुदाळतिट्टा; शाम पाटील : राधानगरी, भुदरगड,कागल आणि करवीर तालुक्यातील 218 गावाचे कार्यक्षेत्र असणार्या दुधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री ची पंचवार्षिक निवडणूक कांहीं दिवसांत होत आहे. राज्यात सर्वाधिक सभासद संख्या व चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकी साठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मतदारांची अंतिम पात्र यादी प्रसिद्ध होवून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक प्रक्रिया पुर्ण होणार असल्याची चर्चा आहे.यामुळे बिद्री साखर कारखाना कार्यक्षेत्रात निवडणूक पुर्व वातावरण निर्माण झाले आहे.बिद्रीच्या चिमणीची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

विरोधी गटाचे नेते खासदार संजय मंडलिक यांनी नुकतेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत बिद्री कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खरचं बिद्री ची निवडणूक बिनविरोध होऊन एक नवा इतिहास निर्माण होणार काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.शाहु, मंडलिक अशा अन्य कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले.पण बिद्री ची निवडणूक प्रयत्न करुन बिनविरोध झालीच नाही.

ऊस दरात लै भारी,गाळपात आघाडी , काटकसरीचा कारभार, पुरस्कार मिळवण्यात आघाडी वर असणारा कारखाना बिनविरोध व्हावा ही अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली तर नवल वाटू नये.यासाठी नेत्यांची ईच्छा शक्ती प्रबळ असणे गरजेची असुन ती प्रत्यक्षात राबवणे आवश्यक आहे.पण या साखर कारखाना निवडणूक संदर्भात अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचं आहे.त्यामुळे येणारा काळच ठरवेल निवडणूकीची आगामी दिशा असे जाणकार बोलत आहेत.

या कारखान्याच्या गत निवडणुकीत मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीने लढत दिली होती. त्यामध्ये सत्ताधारी के. पी. पाटील आघाडीने सर्व जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडीत राजकारणाचे संदर्भ बदलत गेले. पाच वर्षानंतर कोरोना पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक पुढे गेली. सध्या निवडणूक होण्याच्या दृष्टीने शासकीय प्रक्रिया सुरु आहेत.

बिद्री साखर कारखान्याचे राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र आहे. ६१ हजार सभासदांपैकी ५५ हजार व्यक्ती व १०२२संस्था सभासद मतदार आहेत. चार तालुक्यातील राजकारणाचे संदर्भ वेगवेगळे आहेत. त्यामुळे चार तालुक्यातील राजकारणाचे पडसाद या ठिकाणी उमटतात.मोठ्या कार्यक्षेत्रातील राजकीय गट व सभासदांची मोठी संख्या या कारणाने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न झालेले नाहीत.

बिद्री साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघाची रंगीत तालीमच म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ज्याला आमदार व्हायचे आहे त्याला बिद्रीची सत्ता आपल्याकडे असावी अशी इच्छा असते. या इच्छे पोटीच या कारखान्याची निवडणूक लागते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन गट, भाजपा, जनता दल, शेतकरी संघटना ,कांहीं स्थानिक राजकीय गट या सर्वांच्या बिनविरोध निवडणूक करण्यात अडचणी असतात कारण आपल्या कार्यकर्त्यांना ते संधी देऊ शकत नाही. चारही तालुक्यातील राजकारणाच्या वेगवेगळ्या आघाड्या,युक्त्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे शेवटच्या क्षणी बिद्रीची निवडणूक अटळ होते.

खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बिद्रीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण कागल मध्ये जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे.आमदार प्रकाश आबिटकर यांनी बिद्री च्या कारभारावर टीकाटिप्पणी करायची संधी सोडली नाही.साखर कारखान्यांकडून काटा मारी होते,उस उत्पादकांची लुबाडणूक केली जाते ती होऊ नये म्हणून गाजावाजा करीत शेतकरी मित्र ऊस वजन काट्याची उभारणी केली. यावर ही आरोप प्रत्यारोप झाले. यानिमित्ताने बिद्रीचा धर्म काटा आणि शेतकरी मित्र काटा चर्चेत आले. ऊस तोडणी कार्यक्रमावर आरोप झाले. मग बिद्री ची निवडणूक बिनविरोध होईल कशी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बिद्री साखर कारखान्यात नेतृत्व करणारे नेते हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संजय मंडलिक हे आघाडीच्या माध्यमातून अनेक निवडणूकीत एकत्र आले आहेत. तर बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व आमदार प्रकाश आबिटकर हे विरोधक असताना देखील दूध संघ, बाजार समिती, भुदरगड तालुका संघ या निवडणुकीत एकत्र आले आहेत. त्यामुळे बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील हि नेते मंडळी एकत्र येऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध केल्यास आश्चर्य वाटणार नाही.पण या निवडणुकीचे घोडे मैदान जवळ आल्याने प्रत्यक्ष काय होणार हे येणारा काळच ठरवेल.

Back to top button