Karnataka Elections : कर्नाटक निवडणूक; कोल्हापूर परिक्षेत्रात ४ कोटींचा मुद्देमाल जप्त; २८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई | पुढारी

Karnataka Elections : कर्नाटक निवडणूक; कोल्हापूर परिक्षेत्रात ४ कोटींचा मुद्देमाल जप्त; २८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात 4 कोटी 41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 88 लाखांची रोकड, 35 हजार लिटर दारु, सव्वा दोन लाखांचा गांजा, 3.25 कोटींचे रसायन, 5 लाखांची 11 पिस्टल, गावठी कट्टे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 2 हजार 890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करुन तपासणी केली जाते आहे. सीमावर्ती भागातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमावर्तीत भागात असणाऱ्या महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच इतर मार्गांवर पोलिसांकडून नाकाबंदी करुन वॉच ठेवला जात आहे. याशिवाय या भागांमध्ये तपासणीसाठी नाके उभे करण्यात आले आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी सीमावर्ती भागात मागील 15 दिवसांत मोठी कारवाई केली आहे.

सोलापूर ग्रामीणमध्ये मोठी कारवाई

सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 88 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच 20.30 लाख रुपयांची 35 हजार लिटर दारु जप्त केली आहे. तर 2.33 लाख रुपयांचा गुटखा जप्त करुन एक टेम्पो, ट्रक, कार, मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय 2.35 कोटी रुपयांचे दारुसाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रात हत्यारे जप्त

कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये 7 केसेस करुन 11 पिस्टल, गावठी कट्टे, 4 कोयते असा एकूण 5 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीआरपीसी 107 नुसार 1 हजार 875 जणांवर, 108 नुसार 7 जणांवर, 109 नुसार 18, 110 नुसार 86, 149 नुसार 728 आणि 144 नुसार 89 असे एकूण 2 हजार 890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

Back to top button