

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या आणि पुन्हा एकदा महापालिका सभागृहात जाण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या दहा नगरसेवकांना यंदा मात्र सभागृहात जाता येणार नाही. हे कोण नगरसेवक आहेत, ते मात्र दि. 16 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या 81 जागांसाठी 20 प्रभागांतून तब्बल 327 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दहा वर्षांनी होणार्या महापालिकेच्या या निवडणुकीत गतवेळच्या सभागृहातील 26 नगरसेवकांसह तब्बल 53 माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकला आहे. यामध्ये दोन माजी महापौर, तीन माजी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासह नगरसेवकांचा समावेश आहे. यंदा निवडणूक लढवणार्या माजी नगरसेवकांपैकी 21 जण एकमेकांसमोर आले आहेत.
काँग्रेसकडून सर्वाधिक 22 माजी नगरसेवक निवडणूक लढवत आहेत. मनसेच्या माजी नगरसेवकांनी काँग्रेसच्या सहकार्याने शड्डू ठोकला आहे. भाजपकडून नऊ माजी नगरसेवक, तर शिवसेनेकडून आठ माजी नगरसेवक निवडणूक रणांगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडूनही सात माजी नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही एक माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात आहे. दोन माजी नगरसेवक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
निवडणूक रिंगणात असलेल्या या माजी नगरसेवकांपैकी दहा जण तर सभागृहात जाणारच नाहीत, हे स्पष्टच आहे. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांच्या समोर माजी नगरसेवकच प्रतिस्पर्धी उमेदवारांपैकी एक आहे. यामुळे कोणत्या तरी एका माजी नगरसेवकाचा पराभव होणार आहे. प्रभाग क्रमांक चार ड मध्ये दोन माजी नगरसेवक आमने-सामने आहेत. प्रभाग सहा ब मध्येही दोन माजी नगरसेविकांमध्ये सामना रंगणार आहे. प्रभाग सहा ड मध्येही दोन माजी नगरसेवकांत लढत होत आहे. प्रभाग नऊ ड मध्ये दोनच उमेदवार असून दोघेही माजी नगरसेवक आहेत. प्रभाग 11 ब मध्ये तीन माजी नगरसेविकांत चुरस आहे. प्रभाग 12 ड मध्येही दोघा माजी नगरसेवकांत चुरस आहे. प्रभाग 14 ड मध्ये दोघा माजी नगरसेवकांत लढत होत आहे. प्रभाग क्रमांक 18 क मध्ये माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविका यांच्यात सामना रंगला आहे. प्रभाग क्रमांक 19 ड मध्येही दोघा माजी नगरसेवकांत लढत होत आहे. यापैकी एकालाच संधी मिळू शकते.
अन्य 32 माजी नगरसेवक ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत, त्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांत माजी नगरसेवक कोणीही नाही. असे असले, तरी माजी नगरसेवकांच्या बाजूनेच मतदार कौल देतील की नाही, हे सांगणे कठीणच आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत दहा नगरसेवक तर सभागृहापासून दूर राहतीलच त्यासह अन्य कोणी राहतील का आणि ते कोण असतील, हे मतमोजणीनंतरच सष्ट होणार आहे.
माजी नगरसेवक एकमेकांवर निवडणूक लढत असलेल्या बहुतांश सर्वच ठिकाणी काँटे की टक्कर होणार आहे. त्याची झलक त्या प्रभागात सुरू असलेल्या प्रचारातून दिसत आहे. प्रभाग नऊ ड मध्ये दोनच उमेदवार असून दोघेही माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या थेट सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या प्रभागात रंगत वाढत चालली आहे. प्रभाग 12 ड मध्ये तीनच उमेदवार असले, तरी त्यातील दोन माजी नगरसेवकांतच खरी लढाई होत आहे. त्या ठिकाणीही एकास एकच लढतीचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक 18 क मध्ये तिरंगी लढत आहे. त्या ठिकाणी माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविका यांच्यात लढत होत आहे. यासह अन्य सात ठिकाणीही काँटे की टक्कर होत आहे. प्रत्येक माजी नगरसेवकाला पुन्हा महापालिकेत जायचे आहे. त्याकरिता माजी नगरसेवकांनी कंबर कसली आहे.