

जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील नोकर हौसिंग सोसायटीमध्ये बुधवारी दुपारी एका घराच्या गेटची तोडफोड करून ५२ वर्षांच्या एकाला काठीने मारहाण करून अपहरण केल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झालेली नाही.
शहरातील नोकर हौसिंग सोसायटीच्या एका घरासमोर चारचाकी वाहनातून काही लोक आले. घराच्या गेटची तोडफोड केली. त्यानंतर घरात असलेल्या एकाला घरातून बाहेर उचलून आणले आणि लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. त्यानंतर त्याला काळ्या चारचाकीतून नेण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, घटनेच्या दुसऱ्या दिवशीही जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.
ही घटना बुधवारची असून, काही घरगुती वादातून त्यांच्या नातेवाईकांनीच चारचाकी वाहनातून नेल्याचे दिसत आहे. आम्ही चारचाकी मालकाशी संपर्क केला आहे. मात्र, त्या चारचाकी मालकाने दोन महिन्यांपूर्वी ही चारचाकी विकल्याचे सांगितले. त्याचबरोबर संबंधित कुटुंबांशीही भेट घेतली असून, घरगुती वाद असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली नाही. तरीही आम्ही तपास करीत आहोत.
ज्ञानेश गवई, प्रभारी पोलिस उपअधीक्षक, जयसिंगपूर