कोल्हापूर : शिये परिसरात बिबट्या, वनविभाग सतर्क | पुढारी

कोल्हापूर : शिये परिसरात बिबट्या, वनविभाग सतर्क

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : शिये, ( ता. करवीर ) येथे बिबट्याने एका आठवड्यात तीन वासरांवर हल्ला करत त्यांचा बळी घेतला. हिंस्त्र जंगली प्राण्यांच्या हल्ल्यानंतर शिये परिसरातील शेतकरी व विविध संघटनांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे वनविभाग अॅक्शन मोडवर वर आला आहे. पण आंदोलनाचा इशारा व लेखी पत्रानंतर महावितरणने शेतीला दिवसा वीज देण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान शुक्रवारी काही जणांना शिये भुये रस्तावर बिबट्याचे दर्शन झाल्याबद्दल सोशल मिडीया वर पोस्ट फिरत आहे. याबाबत दुजोरा मात्र मिळाला नाही.

गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास याच परिसरात विष्णू यशवंत चौगले यांना बिबट्या दिसला होता. हा बिबट्या दक्षिण बाजूला गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील वन विभागाच्या वतीने कॅमेरा लावण्यात आला आहे. दोन दिवसांपासून वनविभागाचे दोन वनरक्षक व रेस्क्यू टीमचे सहा जण रात्रंदिवस सदर परिसरात गस्त घालत आहेत. विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या चार सीसीटीव्ही कॅमेरात पहिल्या दिवशी मोठी चार – पाच कुत्री दिसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, मंगळवारी रात्री के बी खुटाळे यांच्या गोठ्यावरील वासरू व बुधवारी सकाळी महादेव माने यांच्या गोठ्यावरील वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले . शेतकऱ्यांमध्ये असलेल्या भीतीचे गांभीर्य लक्षात घेत सरपंच शीतल मगदूम यांनी महावितरणने शेतीला दिवसा वीज देण्याची मागणी केली आहे. तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे व उपसरपंच प्रभाकर काशीद यांनी महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला आहे. तरीही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिये वीज उपकेंद्रात ग्रामपंचायतीने शिये परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आहे. त्यामुळे शेतीला दिवसा वीज द्यावी अशा मागणीचे पत्र दिले आहे.ते पत्र आमच्या कडे असून ते मुख्य कार्यालयाकडे पाठविले आहे.
उपकार्यकारी अभियंता जी.व्ही. पोवार , कोल्हापूर

Back to top button