कोल्‍हापूर : तहसीलदारांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यात शेकडो दाखले प्रलंबित! | पुढारी

कोल्‍हापूर : तहसीलदारांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यात शेकडो दाखले प्रलंबित!

गुडाळ ; पुढारी वृत्‍तसेवा तीन एप्रिल पासून चार दिवस तहसीलदार आणि नायब तहसीलदारांच्या काम बंद आंदोलन सुरू होते. यामुळे जिल्ह्यातील बाराही तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांच्या सह्यांअभावी विविध प्रकारचे शेकडो दाखले प्रलंबित राहिले आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मात्र त्‍यानंर जोडून आलेल्‍या सुट्ट्यांमुळे नागरिकांना दाखले मिळण्यासाठी सोमवारची वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, राज्य पातळीवर सुरू असलेले हे आंदोलन राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. तरीही शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. त्‍यामुळे सोमवारी 10 एप्रिल पासूनच दाखल्यांची निर्गत होणार आहे. साहजिकच दाखल्यां अभावी नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबून राहणार आहेत.

नागरिकांना शासकीय, शैक्षणिक आदी विविध कामांसाठी उत्पन्नाचा, जातीचा, रहिवाशी, नॉन क्रिमिनल, अल्पभूधारक, महिला आरक्षण, ई डब्ल्यू एस, शेतकरी असल्‍याबाबत, डोंगरी भागातील रहिवाशी अशा अनेक प्रकारचे दाखले तहसीलदार कार्यालयामार्फत दिले जातात.
शासनाने महा-ई-सेवा केंद्रामार्फत हे दाखले देण्याची सुलभ व्यवस्था केली आहे. महा इ सेवा केंद्रात आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतर त्याची तहसीलदार कार्यालयामार्फत ऑनलाईन छाननी आणि तपासणी केली जाते. त्यानंतर तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीने अर्जदारांना दाखले अदा केले जातात. या शिवाय विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या सहीने प्रतिज्ञापत्रे प्रमाणित केली जातात.

तहसीलदार आणि नायब तहसीलदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 3 एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन झाल्याने नागरिकांचे दाखले आणि प्रतिज्ञा पत्रांचे कामही रेंगाळले होते. आता काम बंद आंदोलन मागे घेतले असले तरी पुन्हा सलग तीन दिवस लागलेल्या सुट्ट्यामुळे नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली आहेत.

किमान आठवड्यात भराच्या प्रलंबित कालावधी नंतर सोमवारी काम सुरू झाल्यानंतर तातडीने नागरिकांच्या दाखल्यांची निर्गत व्हावी अशी सर्वसामान्य अर्जदारांची अपेक्षा आहे.

हेही वाचा :  

Back to top button